कलासाधक सन्मानाने नवी ऊर्जा मिळाली
By Admin | Updated: March 1, 2015 02:56 IST2015-03-01T00:45:24+5:302015-03-01T02:56:50+5:30
गेली अनेक वर्षे कला व साहित्य क्षेत्रात आपण कार्यरत आहे. या प्रवासात अनेक आनंदाचे क्षण अनुभवले, काही दु:खाचे प्रसंगसुध्दा अनुभवलेत. अनेक पुरस्कार मिळाले.

कलासाधक सन्मानाने नवी ऊर्जा मिळाली
चंद्रपूर: गेली अनेक वर्षे कला व साहित्य क्षेत्रात आपण कार्यरत आहे. या प्रवासात अनेक आनंदाचे क्षण अनुभवले, काही दु:खाचे प्रसंगसुध्दा अनुभवलेत. अनेक पुरस्कार मिळाले. मात्र ज्या नवोदिता संस्थेतून आपल्या नाट्यप्रवासाला सुरुवात झाली त्या नवोदितातर्फे मिळालेल्या कलासाधक सन्मानाने नवी ऊर्जा मिळाल्याचे मत कलासाधक सन्मानाचे मानकरी श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केले.
मराठी राजभाषा दिन तसेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जयंती दिनाचे औचित्य साधुन नवोदितातर्फे श्रीपाद जोशी यांना कलासाधक सन्मान प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना श्रीपाद जोशी यांनी अनेक आठवणींना उजाळा देत कला, साहित्य प्रवासात साथ देणा-या व्यक्तींविषयी कृतज्ञता व्यक्त केली. सोहळयाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर होते. मंचावर स्मिता जोशी, नवोदिताचे अध्यक्ष शरद गुप्ता, डॉ. जयश्री कापसे-गावंडे, प्रशांत कक्कड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी नवोदितातर्फे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचाही सत्कार करण्यात आला. सांस्कृतिक क्षेत्रात नवोदिता या संस्थेने दिलेले योगदान महत्वाचे आहे. नवोदिताच्या कलावंतांनी राज्य नाटय स्पर्धेत उत्तुंग यश संपादन करून या जिल्हयाची मान अभिमानाने उंच केल्याचे ते म्हणाले.
चंद्रपूरचे सांस्कृतिक वैभव व येथील सांस्कृतिक संस्था, कलावंतांची कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आहे. या शहरात झालेले कौतुक आपण कधीही विसरु शकणार नाही, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांनी केले.
प्रास्ताविक अजय धवने यांनी केले. सुधीर मुनगंटीवार आणि श्रीपाद जोशी यांच्या मानपत्रांचे वाचन आशिष अंबाडे यांनी केले. नवोदिताच्या ‘चिंधीबाजार’ या नाटकाला मराठी अंतिम नाट्य स्पर्धेत तसेच हिंदी नाट्य स्पर्धेत मिळालेल्या उत्तुंग यशाबद्दल यशस्वी चमूचे कौतुक शुभा खोटे आणि ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. या यशाबद्दल दिग्दर्शक डॉ. जयश्री कापसे-गावंडे यांनी मनोगत व्यक्त केले.
समारंभाचे संचालन यशश्री अंबाडे यांनी केले. सोहळयानंतर श्रीपाद जोशी रंगप्रवासावर दृष्टीक्षेप टाकणा-या श्रीरंग हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमात कवितांचे साभिनय सादरीकरण, श्रीपाद जोशी यांच्या नाटकातील प्रसंग, त्यांच्या विषयी मान्यवरांच्या प्रतिक्रीया श्रीरंग मध्ये सादर करण्यात आल्या. यात डॉ. जयश्री कापसे- गावंडे, प्रशांत कक्कड, सुशील सहारे, नुतन धवने, श्रीनिवास मुळावार, रोहिणी उईके, बबिता उईके, अश्वीनी खोब्रागडे, गायत्री देशपांडे, डॉ. पद्मरेखा धनकर-वानखेडे, अॅड. वर्षा जामदार, रीतेश चौधरी, मयुर कोहळे, बकुळ धवने आदिंनी सहभाग घेतला. (नगर प्रतिनिधी)