नियम न पाळत चबुतऱ्यावरील गप्पागोष्टी भोवल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:27 IST2021-04-18T04:27:23+5:302021-04-18T04:27:23+5:30
सास्ती : राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या सास्ती-धोपटाळा वसाहतीजवळील एका चबुतऱ्यावर सायंकाळी गप्पागोष्टी करीत खर्राचे सेवन करणाऱ्या सहा मित्रांना कोरोनाची लागण ...

नियम न पाळत चबुतऱ्यावरील गप्पागोष्टी भोवल्या
सास्ती :
राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या सास्ती-धोपटाळा वसाहतीजवळील एका चबुतऱ्यावर सायंकाळी गप्पागोष्टी करीत खर्राचे सेवन करणाऱ्या सहा मित्रांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना काळात नियमांचे पालन न करणे या मित्रांना चांगलेच अंगलट आले आहे.
वेकोलिच्या सास्ती-धोपटाळा या कोळसा खाण कामगारांच्या वसाहतीजवळ आयटक व बीएमएम या कामगार संघटनांचे कार्यालय आहे. या समोरच रस्त्याच्या बाजूला एक सिमेंटचा चबुतरा आहे. खाणीतील काम संपल्यावर सायंकाळी या चबुतऱ्यावर येऊन गप्पागोष्टी करीत टाइमपास करणे, हा या वसाहतीत राहणाऱ्या सहा कामगार मित्रांचा छंद होता. हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळ्यातही यात खंड पडला नाही. मात्र, आता कोरोना काळ आहे. येथे गप्पागोष्टी व्यर्ज्य नसल्या तरी मास्क वापरणे, शारीरिक अंतर ठेवणे अशा नियमांचे पालन आवश्यक आहे. या मित्रातील काहींना खर्रा व तंबाखू खाण्याचा छंद होता. या गोष्टी एकमेकांना आग्रह करून दिल्या जात होत्या. नुकताच यापैकी एकाला ताप आला आणि त्याने कोरोना तपासणी केली तेव्हा त्याला कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे निदान झाले. यानंतर या सर्वच मित्रांनी कोरोना तपासणी करण्याचे याच चबुतऱ्यावर ठरविले. तपासणीनंतर सर्वच सहाही मित्र पॉझिटिव्ह आले. यापैकी एकाला चंद्रपूरला बेड न मिळाल्याने अमरावतीला पाठविण्यात आले आहे. यानंतर परिवाराची कोरोना तपासणी करण्यात आली. यात काहींच्या पत्नी पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती आहे.
कोरोनाविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली असताना केवळ दुर्लक्ष व निष्काळजीमुळे या लोकांसह त्यांच्या परिवाराला आता दवाखान्यात भरती होण्याची पाळी आली आहे.
कोट
राजुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोणाचा शिरकाव होत आहे. प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सतत हात धुणे या त्रिसूत्रीचा अवलंब करावा.
- डॉ. कुळमेथे, वैद्यकीय अधीक्षक, राजुरा.