गोसीखुर्द उजवा कालव्याचे काम अर्धवट

By Admin | Updated: August 27, 2016 00:37 IST2016-08-27T00:37:28+5:302016-08-27T00:37:28+5:30

तळोधीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या जनकापूर- पळसगाव (खुर्द) या गोसीखुर्द उजव्या कालव्याचे काम अर्धवट करण्यात आले आहे.

Gosikhurd right canal work | गोसीखुर्द उजवा कालव्याचे काम अर्धवट

गोसीखुर्द उजवा कालव्याचे काम अर्धवट

पाण्याअभावी पिके संकटात : जनकापूर - पळसगाव येथील शेतकऱ्यांना फटका
तळोधी (बा.): तळोधीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या जनकापूर- पळसगाव (खुर्द) या गोसीखुर्द उजव्या कालव्याचे काम अर्धवट करण्यात आले आहे. या कालव्याचे काम करताना मोडतोड केल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे धान पीक पाण्याअभावी संकटात सापडले आहे. जवळपास ८० एकर क्षेत्राला याचा फटका बसत आहे. त्यामुळे या कालव्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी पीडित शेतकऱ्यांनी केलेली आहे.
मागील सात वर्षापूर्वी जनकापूर- पळसगाव (खुर्द) या गोसीखुर्द उजव्या कालव्याचे करोडो रुपये खर्च करुन काम करण्यात आले. निधीअभावी या कालव्याचे काम मधेच सोडून देण्यात आले आहे. या भागातील शेतकऱ्यांना सिंचाई विभाग नागभीड अंतर्गत जनकापूर- येथील गट नं. ३४८ मामा तलावाचे निस्तार हक्कानुसार पाणी मिळत होते. मात्र गेल्या सात वर्षापासून गोसीखुर्द उजव्या कालव्याचा अर्धवट काम केल्यापासून सदर शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. मिंडाळा मंडळातील ८० एकरात पिकांची लागवड करून आपल्या पोटाची खडगी भरणारे शेतकरी दयाराम नान्हे, डुकरु नान्हे, हिरालाल शेंडे, पुरुषोत्तम गुरुनुले, आशीष गुरुनुले, सुरेश पाटील काशिवार, अरुण काशिवार, मानिक शेंडे, पुरुषोत्तम नवघडे, सोमेश्वर बावनघडे, महेश तोडासे, मारोती मोहुर्ले व अरविंद शेंडे या शेतकऱ्यांना निस्तार हक्कानुसार सदर तलावाचे पाणी लागू असताना सदर कालव्यामुळे पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. सदर शेतकऱ्यांनी गेल्या सात वर्षापासून स्थानिक आमदारांना या कल्पनेची माहिती देऊनसुद्धा ते शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आमदारांविषयी शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच या जनकापूर- पळसगाव गोसीखुर्द उजव्या कालव्यामध्ये पळसगाव येथील हिरालाल शेंडे यांची गट नं. ४६ ची शेतजमीन गेली आहे. मात्र त्यांना अद्यापही याचा मोबदला देण्यात आलेला नाही. त्यांना यासाठी शासन दरबारी पायपीट करावी लागत आहे.
अगोदरच शेतकरी संकटात सापडला आहे. शेतमालाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्ग कर्जापायी आत्महत्या करीत आहे. तरीही शासन व्यवस्थेकडून बळीराजाची थट्टा केली जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन त्वरित शेतकऱ्यांना न्याय द्यावा व बळीराजाचे पीक वाचविण्यासाठी त्वरित पाणी उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी पीडित शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)

मागील सात वर्षापूर्वी जनकापूर - पळसाव गोसीखुर्द उजव्या कालव्याचे अर्धवट कामे करुन निस्तार हक्क असणाऱ्या जनकापूर सिंचाई मामा तलावाच्या पाण्यापासून शेतकऱ्यांना वंचित केले आहे. त्यामुळे सदर शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आलेली आहे. पीडित शेतकऱ्यांना पीक वाचविण्यासाठी कर्ज काढून उपाययोजना कराव्या लागत आहे. शासनाने मोडकळीस आलेला जनकापूर मामा तलावाचा कालवा (पाट) दुरुस्त करुन पाणी उपलब्ध करुन द्यावे.
- अतुल सिद्धमशेट्टीवार, माजी तंटामुक्त अध्यक्ष

Web Title: Gosikhurd right canal work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.