पर्यटन प्रकल्प रोजगारासाठी चांगली संधी
By Admin | Updated: December 30, 2015 01:47 IST2015-12-30T01:47:34+5:302015-12-30T01:47:34+5:30
मोहुर्ली वन परिक्षेत्रांतर्गत वन परिस्थितीकी समिती व वनविभाग यांच्या मार्फत सुरु असलेला पर्यटन प्रकल्प स्थानिकांना ...

पर्यटन प्रकल्प रोजगारासाठी चांगली संधी
स्वाधीन क्षेत्रीय : मोहुर्ली वन परिक्षेत्रातील पर्यटन प्रकल्पाला भेट
चंद्रपूर : मोहुर्ली वन परिक्षेत्रांतर्गत वन परिस्थितीकी समिती व वनविभाग यांच्या मार्फत सुरु असलेला पर्यटन प्रकल्प स्थानिकांना रोजगारासाठी चांगली संधी असल्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षेत्रीय यांनी सांगितले. या प्रकल्पास नुकतीच मुख्य सचिवांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक गजेंद्र नरवणे, उपसंचालक कळसकर, वनपरिक्षेत्र अधिकारी शिंदे व स्थानिक वन अधिकारी उपस्थित होते.
नवरगाव चौकी येथील आगरझरी वन पर्यटन रस्ता, अडेगाव-देवाडा वन पर्यटन रस्ता, देवाडा समितीमार्फत चालू असलेले भेट वस्तू दुकान व अडेगाव समितीमार्फत सुरु असलेल्या उपाहारगृहाची पाहणी यावेळी मुख्य सचिवांनी केली. सदर पर्यटन प्रकल्पात स्थानिकांना मोठया प्रमाणात रोजगार मिळत असून समितीमध्ये या प्रकल्पाच्या माध्यमातून मोठया प्रमाणात गाव विकासासाठी निधी उपलब्ध होत असल्याबाबत मुख्य सचिवांना माहिती देण्यात आली. या उपक्रमाचे त्यांनी कौतुक करुन गाव विकासासोबतच स्थानिकांना रोजगाराची चांगली संधी देणारा हा प्रकल्प असल्याचे गौरवोद्गार क्षत्रिय काढले.
या पर्यटन प्रकल्पास मागील महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली होती. यावेळी त्यांनी विक्री केंद्रातून वस्तू खरेदी करून समितीचा उत्साह वाढविला होता. उपाहारगृहातून आतापर्यंत ४० हजारांची विक्री झाली असून भेट वस्तू दुकानातून ४५ हजारांची विक्री झाली आहे. या दोन्ही ठिकाणी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मुख्य सचिवांच्या निर्दशनास आणून देण्यात आले. नवरगाव चौकी येथील वन पर्यटन प्रकल्पात ६० युवकांना गाईड व जिप्सी चालकांना रोजगार मिळत आहे. गाईडला ३०० रुपये पर सफारी तर जिप्सी चालकांस एक हजार ५०० रुपये पर सफारी उत्पन्न मिळते. (प्रतिनिधी)