सर्वंकष विकासासाठी सुशासन अत्यावश्यक
By Admin | Updated: January 1, 2016 01:51 IST2016-01-01T01:51:11+5:302016-01-01T01:51:11+5:30
देशाच्या संविधानाशी अभिप्रेत असलेली लोकशाही समृद्ध मानली गेली आहे. त्यामुळे लोकशाहीच्या माध्यमातून प्रशासनाचे

सर्वंकष विकासासाठी सुशासन अत्यावश्यक
चंद्रपूर : देशाच्या संविधानाशी अभिप्रेत असलेली लोकशाही समृद्ध मानली गेली आहे. त्यामुळे लोकशाहीच्या माध्यमातून प्रशासनाचे कार्य प्रभावीपणे चालल्यास किंबहूना शासन व प्रशासनाच्या कार्यास लोकाभिमुखतेची जोड दिल्यास खऱ्या अर्थाने सुशासनाची प्रतिष्ठापणा होऊ शकते व हे कार्य राष्ट्रस्तरीय ठरल्यास देशाच्या सर्वकष विकासाचा वेग अधिक गतिमान व प्रशस्त होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसापासून प्रारंभ झालेल्या राष्ट्रीय सुशासन दिन सप्ताहाच्या अनुषंगाने आयोजित नागरिकांशी संवाद या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.
स्थानिय प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री शांताराम पोटदुखे हे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी आ. नाना शामकुळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार प्रा. अतुल देशकर, माजी मंत्री संजय देवतळे, आ. संजय धोटे, वणीचे आमदार संजीव रेड्डी, बोदरकुरवार, आर्णीचे आमदार राजू तोडसाम, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरुनुले, महापौर राखी कंचर्लावार, चंदनसिंह चंदेल, विजय राऊत, रमेश बागला, प्रमोद कडू, उपमहापौर वसंत देशमुख, महिला नेत्या वनिता कानडे, डॉ. एम. जे. खान, देवराव भोंगळे, हरिश शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर, उपजिल्हाधिकारी संजय धिवरे, उपविभागीय अधिकारी कल्पना निळ, संजय दैने, अनिल फुलझेले, अंजली घोटेकर, नामदेव डाहूले आदींची मंचावर उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे संयुक्त संचालन अंजली घोटेकर, नासिर खान यांनी केले.
कार्यक्रमाला चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, बल्लारपूर, मूल, वणी आदी तालुक्यातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे, चंद्रपूर शहरातील विविध क्षेत्रातील व्यक्ती, भाजपाचे व अन्य पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून या राष्ट्रीय सुशासन दिन कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. (प्रतिनिधी)