गोंदोड्याच्या महिलेने केली किडनी दान
By Admin | Updated: August 21, 2016 02:55 IST2016-08-21T02:55:31+5:302016-08-21T02:55:31+5:30
‘श्रेष्ठ दान, रक्त दान’ अशी म्हण प्रचलित आहे. परंतु हे सोपे दानही करायला कोणी तयार नसतात.

गोंदोड्याच्या महिलेने केली किडनी दान
वाचले प्राण : आदर्श निर्माण केला
पेंढरी (कोके) : ‘श्रेष्ठ दान, रक्त दान’ अशी म्हण प्रचलित आहे. परंतु हे सोपे दानही करायला कोणी तयार नसतात. परंतु राष्ट्रसंतांची तपोभूमी असलेल्या गोंदेडा (ता. चिमूर) येथील महिलेने आपल्या जावयाला आपली डावी किडनी दान करून जावयाचे प्राण वाचविले आणि समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला.
मूत्रपिंड दान करणाऱ्या आदर्श महिलेचे नाव रत्नमाला नानाजी सोनुले असून ती ग्रामपंचायत सदस्य आहे. तसेच ती गुरुदेवाची भक्त आहे. सामुदायिक प्रार्थना, ध्यान व गुरुदेवाचे कार्य हे तिचे अंतिम ध्येय आहे. तिचे आॅर्डनन्स फॅक्टरी भद्रावती येथे नोकरीवर असलेले बहीण जावई योगेश्वर मोतीराम लेनगुरे यांचे वर्षभरापूर्वी दोन्ही मूत्रपिंड खराब झाले होते. त्यामुळे ते मृत्यूशी झुंज देत होते. त्यांनी स्वत:चे आई- वडील, भाऊ, बहीण यांना ही माहिती दिली. परंतु किडनी दान करण्यासाठी कोणीच तयार झाले नाही व रक्तही दिले नाही. शेवटी रत्नमालाचे शेतकरी असलेले पती नानाजी सोनुले, रत्नमाला व त्यांचे कुटुंब जावयाला एक किडनी देण्यास तयार झाले.
मूत्रपिंड काढणे व लावण्याची यशस्वी शस्त्रक्रियाही पूर्ण झाली. आज दोघांचीही प्रकृती चांगली आहे. या संदर्भात रुग्ण योगेश्वर लेनगुरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले येथे अनेकजण साधे रक्तही दान करीत नाही. मात्र पत्नीच्या बहिणीने किडनी दान करून माझे प्राण वाचविले. तिच्यामुळेच मी आज जग पाहत आहो. (वार्ताहर)