गोंडपिपरी ग्रामपंचायतीत सदस्यांचा मनमानी कारभार
By Admin | Updated: September 25, 2014 23:21 IST2014-09-25T23:21:30+5:302014-09-25T23:21:30+5:30
येथील ग्रामपंचायत विविध मुद्यांमुळे नेहमीच वादग्रस्त ठरत असून गावातील प्रत्येक प्रभागात लावण्यासाठी आलेले पथदिवे ग्रामपंचायत सदस्यांनी स्वार्थापोटी आपल्याच प्रभागात पळविल्याने

गोंडपिपरी ग्रामपंचायतीत सदस्यांचा मनमानी कारभार
गोंडपिंपरी : येथील ग्रामपंचायत विविध मुद्यांमुळे नेहमीच वादग्रस्त ठरत असून गावातील प्रत्येक प्रभागात लावण्यासाठी आलेले पथदिवे ग्रामपंचायत सदस्यांनी स्वार्थापोटी आपल्याच प्रभागात पळविल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
शहरातील बहुतांश मार्गावरील पथदिवे बंद आहेत. काही मार्गावर अद्यापही पथदिवे लावण्यातच आले नाहीत. तंटामुक्त समितीच्या पुरस्कारातून खरेदी केलेल्या बैठक ओट्यांचीही जागा चुकीची असून अशा नियंत्रणहीन ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांवर वरिष्ठस्तरावरुन कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
तालुकास्तरावरील गोंडपिंपरी ग्रामपंचायतीवर शहर विकासाची मोठी जबाबदारी आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून सदर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आपल्या पदाचा दुरुपयोग करुन नागरिकांना द्यावयाच्या सोयीसुविधा हिसकावून स्वगृह परिसरात रस्ते, नळजोडणी, नाली बांधकाम, सिमेंट रस्ते व पथदिवे बसवून कमालीचा मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून केल्या जात आहे. याच दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी या ग्रामपंचायतस्तरावर शहरातील प्रत्येक प्रभागाच्या मार्गावर लावण्यासाठी पथदिवे प्राप्त झाले. त्याचे नियोजन न करताच काही पदाधिकाऱ्यांनी आपला रुबाब दाखवून प्रभागाच्या वाट्याला येईल, त्या पेक्षा अधिक पथदिवे नेवून स्वत:च्या परिसरात लावून घेतले. पथदिवे बसविण्याचे कुठलेही नियोजन नसल्याने काही सदस्यांनी आपल्या आप्तांच्या दारातील खांबावरही पथदिवे लावून घेतल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली.
येथील तंटामुक्त समितीला १० लाखांचा रोख पुरस्कार मिळाला. या पुरस्कारातून ग्रामपंचायत कार्यालयात महागडे शितल जल यंत्र, सौर ऊर्जेचे लाईट, बैठक ओटे अशी विविध साहित्य खेरदी करुन वाजवीपेक्षा अधिक रक्कमेचे बिल जोडल्याचीही आरोप नागरिकांकडून होत आहे.
खरेदी करण्यात आलेले बैठक ओटेदेखील प्रभाग सदस्यांनी मनमर्जीने आपल्या प्रभागातील निकटवर्तीयांच्या दुकान व घरासमोर लावून नागरिकांच्या सोयींकडे दुर्लक्ष करीत संबंध जोपासण्यासाठी बैठक ओट्यांचा वापर केल्याचाही आरोप नागरिकांकडून होत आहे.