चंद्रपूर रोडवरून जाताय? सावधान! खड्ड्यांमुळे वाढू शकते पाठदुखी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:18 IST2021-07-22T04:18:34+5:302021-07-22T04:18:34+5:30
चंद्रपूर : शहरातील अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली असताना नव्या पाईपलाईनसाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले; मात्र त्याची थातूरमातूर दुरुस्ती करण्यात ...

चंद्रपूर रोडवरून जाताय? सावधान! खड्ड्यांमुळे वाढू शकते पाठदुखी!
चंद्रपूर : शहरातील अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली असताना नव्या पाईपलाईनसाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले; मात्र त्याची थातूरमातूर दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. परिणामी या रस्त्यावरुन नियमित प्रवास करणाऱ्यांना पाठदुखी व कंबरदुखीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.
चंद्रपूर नगरपालिकेचे विसर्जन करुन महानगरपालिकेमध्ये रुपांतर करण्यात आले. त्यामुळे शहरातील समस्या सुटतील अशी अपेक्षा चंद्रपूरकरांना होती; मात्र या अपेक्षा अल्पावधीतच फोल ठरल्या. शहरातील बाबुपेठ इंदिरानगर पठाणपुरा, रहमतनगर, लालपेठ सवारी बंगला ते चोर खिडकी, सिस्टर काॅलनी यासह शहरातील अंतर्गत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातच पाण्याची नवी पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्याचे खोदकाम केले; मात्र त्याची थातूरमातूर दुरुस्ती केल्याने रस्त्यावरुन जाताना मोठी कसरत करावी लागत आहे.
बॉक्स
फुले चौक ते नेताजी चौक
बाबुपेठ परिसरातील बहुतांश रस्त्याचे अद्यापही सिमेंटीकरण करण्यात आले नाही. येथील फुले चौक, नेताजी चौक, जुनोना चौकातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे रहदारी करण्यास मोठी अडचण जात आहे; मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
तुळसीनगरात पक्का रस्ताच नाही
शहरातील तुळसीनगर, वृंदावननगर परिसरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र येथे अद्यापही पक्के रस्ते तयार करण्यात आले नाहीत. त्यातही रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचून राहते परिणामी वाहन चालविण्यास मोठी कसरत करावी लागत आहे.
वाहनांचा खर्च वाढला, पाठदुखीही वाढली
शहरातील कोणत्याही रस्त्यावरुन गेले तरीही हिच समस्या उद्भवते. रस्त्यावर असणाऱ्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे गाडीचे मोठे नुकसान होत असते. त्यातच अधूनमधून पाठदुखीचाही त्रास होत असतो. त्यामुळे अंतर्गत रस्त्याचे सिमेंटीकरण करणे गरजेचे आहे.
-प्रकाश तेलतुमडे, चंद्रपूर
खाच खळग्याच्या रस्त्यावरुन गाडी जात असल्याने वाहनाचे नुकसान होत आहे. अनेक वाहनचालकांचा खड्डा चुकविण्याच्या नादात अपघात झाल्याच्या घटना घडत आहेत. तर नियमित वाहन चालविणाऱ्यांंना पाठ व मणक्याचा त्रास होत आहे.
शंकर गेडाम, चंद्रपूर
वाढत्या वयाने अंगदुखीचा त्रास होत असतो. त्यातच आणखी शहरातील रस्त्याची भर पडली आहे. शहरातील रस्त्यावरुन वाहन चालविताना खाच खळग्याने मणक्याचा त्रास जाणवत आहे. डॅाक्टरांना दाखवल्यानंतर वाहन चालवू नका, असा सल्ला दिला जात आहे. या समस्यापासून मुक्ती देण्यासाठी रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
-संजय रायपुरे, चंद्रपूर