घुग्घुस कडकडीत बंद, रास्ता रोको आंदोलन
By Admin | Updated: August 9, 2014 01:34 IST2014-08-09T01:34:02+5:302014-08-09T01:34:02+5:30
घुग्घुस गावांची लोकसंख्या, भौगोलिक परिस्थिती, औद्योगिक क्षेत्र असताना घुग्घुस ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्यास शासनाकडून टाळाटाळ होत आहे.

घुग्घुस कडकडीत बंद, रास्ता रोको आंदोलन
घुग्घुस : घुग्घुस गावांची लोकसंख्या, भौगोलिक परिस्थिती, औद्योगिक क्षेत्र असताना घुग्घुस ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्यास शासनाकडून टाळाटाळ होत आहे. त्यामुळे घुग्घुस नगर परिषद स्थापना संघर्ष समितीची स्थापना करुन आंदोलन छेडण्यात आले आहे. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात आज सकाळी घुग्घुस बंद, रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यात पोलिसांनी ५८ कार्यकर्त्यांना अटक करुन सुटका केली.
आजच्या रास्ता रोको आंदोलनात तीनशे पेक्षा अधिक लोकांनी भाग घेतला. घुग्घुस पोलिसांनी दंगा नियंत्रण पथक पाचारण केले होते. घुग्घुस बंदच्या दरम्यान मेडीकल वगळता व्यापारपेठ पूर्णत: बंद होती.
गांधी चौकात झालेल्या जाहीर सभेत घुग्घुस नगर परिषद स्थापना संघर्ष समितीचे अध्यक्ष शामराव बोबडे, प्रकाश बोबडे, गणेश शेंडे, ईबादुल सिद्दीकी, भोंगळे, रज्जाक भाई, राकेश जैस्वाल, राजू रेड्डी, नारायण ठेंगणे, प्रेमलाल पारधी, शेख अनवर यासह अनेकांनी आपले विचार व्यक्त केले. रात्री उशिरापर्यंत सभा चालू होती. सभेत मोठ्या संख्येने नागरिकाची उपस्थिती होती. यावेळी शासनाच्या धोरणावर तिव्र शब्दात संताप व्यक्त केला. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शासनाला माहिती पुरविण्याकरिता कामचुकारपणा केल्याचा आरोप करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. गेल्या १५ वर्षापासून या क्षेत्राचे लोकप्रतिनिधी एकीकडे नगर परिषदेचे आश्वासन देऊन गावाच्या विकासाची स्वप्ने दाखवून राजकारण करीत आहेत व घुग्घुसला विकास पासून दूर ठेवत असल्याचा आरोप सभेतून करण्यात आला. (वार्ताहर)