‘त्या’ एव्हरेस्टविरांचे नोकरीकरिता शासनाकडे साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:18 IST2021-07-23T04:18:07+5:302021-07-23T04:18:07+5:30
कोरपना : मिशन शौर्य-२०१८ अंतर्गत कोरपना व जिवती या नक्षलग्रस्त, अतिदुर्गम, आदिवासीबहुल तालुक्यातील पाच रत्नांना शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार ...

‘त्या’ एव्हरेस्टविरांचे नोकरीकरिता शासनाकडे साकडे
कोरपना : मिशन शौर्य-२०१८ अंतर्गत कोरपना व जिवती या नक्षलग्रस्त, अतिदुर्गम, आदिवासीबहुल तालुक्यातील पाच रत्नांना शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार गृह विभागात नोकऱ्या देण्यात याव्या, अशी मागणी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात शासनाकडे केली आहे. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याशी एव्हरेस्टवीरांसह प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले.
याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा सरचिटणीस नामदेव डाहुले, सुभाष कासमगोटूवार, दत्तप्रसन्न महादानी व एव्हरेस्टवीर मनीषा धुर्वे, उमाकांत मडावी, प्रमेश आडे, कविदास काटमोडे, विकास सोयाम उपस्थित होते. राज्याचे तत्कालीन अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून तथा तत्कालीन जिल्हाधिकारी आशुतोष सलील, तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डी. दयानिधी राजा यांच्या नियोजनातून मिशन शौर्य-२०१८ या पहिल्या टप्प्यातील उपक्रमाअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना व जिवती या अतिदुर्गम आदिवासीबहुल नक्षलग्रस्त भागातील दहापैकी पाच विद्यार्थ्यांनी जगातील सर्वाधिक उंचीचे एव्हरेस्ट शिखर सर करून अख्या देशाला आश्चर्याचा धक्का दिला. या पंचारत्न शौर्यवीरांना आ. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून शासनाकडून प्रत्येकी २५ लाख रु. सानुग्रह अनुदान देऊन सन्मानित करण्यात आले होते. या आश्वासनानुसार गृह विभागाच्या वतीने येत्या काही दिवसात होणार असलेल्या मेगा पोलीस भरतीत त्यांना सामावून घेण्याची विनंती जिल्हाधिकारी यांच्याकडे माजी आमदार निमकर यांनी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.