ग्लोबल आयटीआयने केली विद्यार्थ्यांची फसवणूक
By Admin | Updated: May 29, 2014 02:11 IST2014-05-29T02:11:13+5:302014-05-29T02:11:13+5:30
बंगाली कॅम्प परिसरातील औद्योगिक वसाहतीमध्ये नकोडा मल्टीपर्पज एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ग्लोबल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने ..

ग्लोबल आयटीआयने केली विद्यार्थ्यांची फसवणूक
चंद्रपूर : बंगाली कॅम्प परिसरातील औद्योगिक वसाहतीमध्ये नकोडा मल्टीपर्पज एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ग्लोबल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने मान्यता नसतानाही वेल्डर आणि तारतंत्री या अभ्यासक्रमाला सत्र २0१३-१४ मध्ये सुमारे ३१ विद्यार्थ्यांंना प्रवेश दिला. परंतु परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करुन देऊ न शकल्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांंना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. त्यामुळे संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी प्रहारचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केली आहे. ग्लोबल आयटीआयचे संचालक शिल्पा अभिषेक कास्टीया, अभिषेक कास्टीया आणि विमल कास्टीया यांनी प्रतिविद्यार्थी २५ हजार रुपये शुल्क घेऊन वेल्डर या अभ्यासक्रमाला ३0 आणि तारतंत्रीला १ अशा एकूण ३१ विद्यार्थ्यांंना प्रवेश दिला. त्यानंतर हे सर्व विद्यार्थी वेळ मिळेल तेव्हा आयटीआयमध्ये येऊन अभ्यासक्रम पूर्ण करीत होते. परीक्षा तोंडावर आल्यानंतर विद्यार्थ्यांंनी प्रवेशपत्राबद्दल विचारणा केली. तेव्हा सर्व संचालकांनी टाळाटाळ करणे सुरू केले. एवढेच नव्हे तर, विचारणा करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांंना धक्काबुक्की करण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांंनी जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विचारणा केली असता संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अशा कोणत्याही अभ्यासक्रमाला परवानगी नसल्याचे सांगण्यात आले. याची तक्रार विद्यार्थ्यांंनी रामनगर पोलीस ठाण्यात केली. तक्रारीवरुन पोलिसांनी कास्टीया यांना चौकशीसाठी ठाण्यात बोलाविले. चौकशीअंती कारवाईचे आश्वासन दिले. मात्र, संचालकांवर कोणतीच कारवाई केली नाही. उलट संचालकांनी धीरज तेलंग आणि अभाविपचे प्रदीप क्षीरसागर यांच्याविरोधात खंडणी मागितल्याची तक्रार दिली. या तक्रारीवरुन या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणात पोलीस विभागाची भूमिका संशयास्पद असून, पोलीस अधीक्षकांसह रामनगरच्या ठाणेदाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पप्पू देशमुख यांनी केली आहे. तसेच नकोडा मल्टीपर्पज सोसायटीच्या संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कारवाई न केल्यास काही दिवसात आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. पत्रकार परिषदेला प्रहार विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अक्षय येरगुडे, श्रीकांत गौरकार, धीरज शर्मा, प्रविण कुकडे, वैभव तेलंग, गणेश टोंगे, सुशांत पाटील, प्रविण जीवतोडे आदींची उपस्थिती होती. (नगर प्रतिनिधी)