तरुणांच्या हाती जबाबदारी द्या
By Admin | Updated: April 21, 2016 01:15 IST2016-04-21T01:15:46+5:302016-04-21T01:15:46+5:30
पुतळ्याला हार घालून किंवा विहारमध्ये वंदना म्हणून हा लढा जिंकता येणार नाही, यासाठी तरुण पिढीला पुढे येऊ द्या,

तरुणांच्या हाती जबाबदारी द्या
बाळासाहेब आंबेडकर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव
मूल : पुतळ्याला हार घालून किंवा विहारमध्ये वंदना म्हणून हा लढा जिंकता येणार नाही, यासाठी तरुण पिढीला पुढे येऊ द्या, आता त्यांच्यावर जबाबदारी द्या. त्यांच्याशी विचारातून चर्चा करा आणि येणारी पिढी समाज जागृतीसाठी कटिबद्ध राहिली पाहिजे यासाठी प्रयत्न करा. ‘जुनं ते सोनं’ पण सोनं हे पेटीत जमा करण्यासाठी असते, त्यामुळे आता जयंतीच्या निमित्ताने नवा संकल्प करून तरूण पिढीच्या हाती जबाबदारी द्या, असे प्रतिपादन भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केले.
भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने नवभारत विद्यालयाच्या प्रांगणात मंगळवारी आयोजीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सवानिमित्य जनजागृती व मार्गदर्शन सभेत ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अशोक रामटेके होते. यावेळी भारीप बहुजन महासंघाचे नागपूर जिल्हाध्यक्ष राजु लोखंडे, युवा नेते अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सेवचंद्र नागदेवते, भारीप बहुजन महासंघाचे ज्येष्ठ नेते पी.व्ही. मेश्राम, कोषाध्यक्ष बबन चहांदे, शहर सरचिटणीस विजय मेश्राम, शहर कोषाध्यक्ष अशोक कांबळे, विजया रामटेके आदी मान्यवर उपस्थित होते.
अॅड. आंबेडकर पुढे म्हणाले, शिष्यवृत्तीच्या बाबतीत शिक्षण चालक चिंतेत आहे. ओबीसीची शिष्यवृत्ती बंद करून शासन ओबीसीचं खच्चीकरण करीत आहे. यासाठी ओबीसींनी स्वत:हून स्वत:च्या मागण्या मागण्याचं शिकले पाहिजे तरच तो प्रगतीच्या मार्गावर राहू शकतो. आज आय.एस., इंजिनिअर, डॉक्टर बनायचं असेल तर लाखो रुपये मोजावे लागते, गरीब माणुस पैसे भरूच शकला नाही पाहिजे यासाठी हा सर्व उठाठेव असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितले. यावेळी अशोक रामटेके, राजु लोखंडे, अॅड. डॉ. संदिप नंदेश्वर, सेवचंद्र नागदेवते यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शहराध्यक्ष रमेश मानकर यांनी केले. संचालन स्वागत वनकर यांनी तर आभार विजय मेश्राम यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)