दुष्काळ घोषित करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा
By Admin | Updated: January 13, 2016 01:22 IST2016-01-13T01:22:48+5:302016-01-13T01:22:48+5:30
अपुऱ्या पावसाने तसेच विविध रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांच्या धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

दुष्काळ घोषित करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा
गुंजेवाही : अपुऱ्या पावसाने तसेच विविध रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांच्या धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. निसर्गाच्या प्रकोपाने शेतकऱ्यांच्या उभ्या धान पिकाचे नुकसान झाले. शासनाने सिंदेवाही तालुका दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी माजी उपसभापती विरेंद्र किशोर जयस्वाल यांनी केले आहे.
तालुक्यात मागील वर्षी पेक्षा कमी प्रमाणात पाऊस पडला. शेतकऱ्यांनी पीक कर्ज, सावकारी कर्ज, उसनवार रक्कम घेवून धानाची लागवड केली. अपुऱ्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन पडीत राहिली. निसर्गावर अवलंबून असणाऱ्या धान पिकांचे पाण्याअभावी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच विविध रोगांच्या प्रादुर्भावाने धानपीक नेस्तनाबूत झाले. शेतकऱ्यांच्या तोंडाजवळ आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी संकटात आहे.
आर्थिक संकटामुळे घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या विचारात शेतकरी सापडला आहे. धान खरेदी केंद्र सर्व ठिकाणी सुरु न झाल्यामुळे खासगी व्यापारीही शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. शासनाकडून शेतकरी विरोधी धोरण राबविले जात आहे. धानपीक परवडत नसल्याने तसेच अनेकांनी लागवड केलेल्या धानाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात आहे. शेतकऱ्याच्या हितासाठी योग्य ते पाऊल उचलून सिंदेवाही तालुका दुष्काग्रस्त घोषित करण्याची मागणी माजी उपसभापती विरेंद्र किशोर जयस्वाल यांनी केली आहे. याची शासनाने दखल घ्यावी. (वार्ताहर)