गणेशोत्सवात दुसऱ्यांना आनंद, प्रेम, सुख द्या

By Admin | Updated: September 4, 2016 00:45 IST2016-09-04T00:45:47+5:302016-09-04T00:45:47+5:30

चंद्रपूरच्या इतिहासात १२५ वर्षांमधील गणेशोत्सव जातीय सलोखा, धर्मा-धर्मात आनंद देणारा ठरला आहे.

Give happiness, love, happiness to others in Ganeshotsav | गणेशोत्सवात दुसऱ्यांना आनंद, प्रेम, सुख द्या

गणेशोत्सवात दुसऱ्यांना आनंद, प्रेम, सुख द्या

सुधीर मुनगंटीवार : १२५ वर्षांची परंपरा कायम ठेवावी
चंद्रपूर : चंद्रपूरच्या इतिहासात १२५ वर्षांमधील गणेशोत्सव जातीय सलोखा, धर्मा-धर्मात आनंद देणारा ठरला आहे. हा आनंद आता द्विगुणित करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. चंद्रपूरच्या गणेशोत्सवाचा लौकीक संपूर्ण महाराष्ट्रात शांतता, अमन आणि एकता वाढविणारा असल्याचा आहे. या गणेशोत्सवात आपल्यापासून कोणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घ्या. या आनंददायी सोहळ्यात दुसऱ्यांना आनंद, प्रेम, अमन, चैन, सुख आदीचे वाटप करा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी केले.
पोलीस मुख्यालयात चंद्रपूर शहरातील गणेशोत्सव मंडळांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्षस्थानी ना. मुनगंटीवार होते. मंचावर चंद्रपूरचे आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरूनुले, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवान, सहायक धर्मदाय आयुक्त चव्हाण आदी उपस्थित होते.
ना. मुनगंटीवार म्हणाले की, १२५ वर्षांपूर्वी जाती-धर्माच्या वर विचार करून काही तरूण मुंबई येथील गिरगाव चौपाटीवर एकत्र आले. त्यांनी इंग्रजाविरोधात समाज जागृत करण्यासाठी घरात बसविण्यात येणारा गणेशोत्सव सार्वजनिक करण्याची कल्पना मांडली. लगेच त्यावर अंमलबजावणी केली. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने यावर्षी लोकमान्य गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. आपला जिल्हा सात्विक लोकांचा आहे. या जिल्ह्यातील गणेशोत्सवात कधी हिंदू, मुस्लीम, शीख, बौद्ध यांची दंगल झाली नाही. मंत्रालयात बसून संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा घेत असताना चंद्रपूरचा अभिमान वाटतो. हा अभिमान असाच कायम ठेवा. गणेश मिरवणुकीदरम्यान, मशीद आली तर प्रशासकीय अधिकारी ताशे वाजवू नका, असे आवाहन करतात. त्याला प्रतिसाद देऊन गणेश मंडळ ताशे वाजवायचे थांवून मुस्लिमांच्या धार्मिक भावनांचा आदर करतात. चंद्रपूर अमन, शांतताप्रिय शहर आहे. या नावाला गालबोट लागता कामा नये, असे आवाहनही त्यांनी केले.
गणेश मंडळांनी भरीव काम करावे, यासाठी महाराष्ट्र शासन लोकमान्य गणेशोत्सव साजरा करीत आहे. गणेशोत्सव बक्षिसासाठी साजरा केला जात नाही, याची मला जाणीव आहे. तो हृदयातून साजरा केला जातो. मात्र, लोकमान्य टिळकांच्या ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच’, या घोषणेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या सिंहगर्जनेचे महत्त्व लक्षात ठेवण्यासाठी स्वदेशी, साक्षरता, बेटी बचाव, व्यसनमुक्ती आणि जलसंधारण या पाच विषयांवर देखावे तयार करणाऱ्या मंडळांना बक्षीस देण्यात येणार आहे. देखावे तयार करताना त्या कामांची सुरुवात स्वत:पासून करावी. समाज एका दिवसात बदणार नाही. पण किमान कुणाला तरी त्याची सुरुवात करावी लागेल, असेही ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.
यावेळी बोलताना आ. नाना शामकुळे यांनी सर्वधर्मसमभाव, जाती-धर्मात शांततेची निर्मिती चंद्रपूर जिल्ह्यातून निर्माण होत असल्याचे सांगून यावर्षीच्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात गणेशोत्सवाला विशेष महत्त्व देण्यात आल्याची माहिती दिली. यावेळी उपस्थित पाहुण्यांनीही मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)

महिला पोलिसांचा सत्कार
याप्रसंगी घुग्घुस पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस काँस्टेबर प्रतिभा डवले यांचा पालकमंत्री सुधीर मनुगंटीवार याच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रतिभा डवले साध्या गणवेशात वाहनाने जाताना रोडरोमियोचे एक टोळके शेरेबाजी करीत होते. त्यावेळी डवले यांनी रणरागिणीचे रूप धारण करून त्यांना थांबवून चोप दिला. तोपर्यंत टोळक्याला त्या महिला पोलीस असल्याचे माहिती नव्हते. ते समजताच पळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा प्रतिभा डवले यांनी तिघा-चौघांच्या दुचाकीच्या वाव्या ताब्यात घेऊन घुग्घुस पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचून मजनुंना अटक करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून फरार आरोपींचीही माहिती घेऊन अटक करण्यात आली. त्याबद्दल डवले यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Give happiness, love, happiness to others in Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.