जिल्हा निधीतून विद्यार्थ्यांना मोफत गणवेश द्या

By Admin | Updated: August 9, 2015 01:17 IST2015-08-09T01:17:22+5:302015-08-09T01:17:22+5:30

सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या वर्ग १ ते ८ मधील अनुसूचित जाती- जमातीची मुले, ....

Give free uniform to students through district fund | जिल्हा निधीतून विद्यार्थ्यांना मोफत गणवेश द्या

जिल्हा निधीतून विद्यार्थ्यांना मोफत गणवेश द्या

विजय देवतळे : मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन
चंद्रपूर : सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या वर्ग १ ते ८ मधील अनुसूचित जाती- जमातीची मुले, सर्व मुली आणि दारिद्र्यरेषेखालील मुलांना शाळा व्यवस्थापन समितीमार्फत दोन गणवेश मोफत पुरविल्या जातात. मात्र इतर मागास, बिगर मागास, विमुक्त भटक्या, विशेष मागास प्रवर्गातील मुलांना या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यांनाही जिल्हा निधीतून मोफत गणवेश पुरविण्यात यावे, अशी मागणी जि.प. चे स्थायी समितीचे सदस्य डॉ.विजय देवतळे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे एका निवेदनातून केली आहे.
गणवेशाचे वितरण करताना शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांनासुद्धा अनेक पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समितीकडून शाळामधूनच जातीयवादाचे बीजारोपण केल्या जात आहे. शिस्त, सर्वधर्मसमभाव व राष्ट्रीय एकात्मतेचे धडे देणारे शिक्षकसुद्धा या योजनेमुळे हतबल झाले आहेत. या संदर्भात अनेक पालक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समित्या यांच्या सुचनांची दखल घेत डॉ. विजय देवतळे यांनी जि.प. च्या अध्यक्ष संध्या गुरनुले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना निवेदन दिले. त्यांनी सर्व शिक्षा अभियानापासून वंचित राहणाऱ्या सर्व जातीच्या संवर्गातील मुलांना जि.प. च्या जिल्हा निधीतून सन २०१५-१६ या शैक्षणिक सत्रात मोफत गणवेश पुरविण्याची मागणी केली. सर्वांना गणवेश दिल्यास मुलांमध्ये दुजाभाव निर्माण होणार नाही, त्यांच्यामध्ये शाळेची आवड निर्माण होऊन गैरहजेरीचे प्रमाणही कमी होईल, सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळाल्याचे समाधान विद्यार्थी, पालक, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समित्यांना होईल, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रति शिक्षण सभापती देवराव भोंगळे, शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे यांना दिले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

 

Web Title: Give free uniform to students through district fund