लहान कंत्राटदारांना ४० टक्के कोटेशनची कामे द्या
By Admin | Updated: December 22, 2014 22:44 IST2014-12-22T22:44:35+5:302014-12-22T22:44:35+5:30
वीज निर्मिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आशिष शर्मा यांनी जुलै २०१३ पासून येथील इक्वायरी, कोटेशन स्वरुपाची कंत्राटी कामे देणे बंद केल्यामुळे येथील सुमारे ५० ते ८० कंत्राटदारावर उपासमारीची

लहान कंत्राटदारांना ४० टक्के कोटेशनची कामे द्या
चंद्रपूर : वीज निर्मिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आशिष शर्मा यांनी जुलै २०१३ पासून येथील इक्वायरी, कोटेशन स्वरुपाची कंत्राटी कामे देणे बंद केल्यामुळे येथील सुमारे ५० ते ८० कंत्राटदारावर उपासमारीची पाळी आली आहे. कामावर जगणारा मजूर वर्ग कामासाठी भटकू लागला आहे. येथील ३० लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणारे कंत्राटदार मात्र मोठ्या प्रमाणात लाखोंच्या निविदा प्राप्त करीत आहेत. व्यवस्थापकीय संचालक, मुख्य अभियंता व विभाग प्रमुख आपली भागीदारी ठेवून लुटमार करीत आहेत. त्यामुळे वीज निर्मिती केंद्राला व संपत्तीला धोका निर्माण झाला आहे.
येथील स्थानिक बेरोजगार, अभियंता, सेवा सहकारी संस्था, प्रकल्पग्रस्त कंत्राटदार, महिला बचत गट या लहान कंत्राटदारांना ज्यांचे भांडवल मर्यादित आहे, ते टेंडर घेऊ शकत नाही, अशा स्थानिकांंवर अन्याय होत आहे. महाराष्ट्र सरकारने नागपूर विधिमंडळ कार्यकाळात सामूहिक बैठक लावून येथे वीज कंपनीने बंद केलेले कोटेशन, इंक्वायरीची कामे ४० टक्के सुरू करण्याचा निर्णय घेवून न्याय द्यावा, या मागण्यांसाठी स्मॉल स्केल कॉन्ट्रक्टर असोसिएशन चंद्रपूरच्या नेतृत्त्वात धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन सादर करण्यात आले. या आंदोलनात ३० ते ५० लहान कंत्राटदार, बेरोजगार अभियंता, प्रकल्पग्रस्त कंत्राटदार, महिला बचत गटाच्या सदस्य सहभागी झाल्या होत्या. यावेळी लहान कंत्राटदारांना वर्षात प्राप्त होणाऱ्या एकूण फंडाच्या ४० टक्के रक्कम कोटेशन वर्ककरीता निश्चित करून देण्यात यावी व एकूण कामाच्या ४० टक्के कामे कोटेशन, इंक्वायरी उपलब्ध करून देण्यात यावे, ज्या सभासदांकडे कामे नाहीत त्यांना तत्काळ तीन ते पाच लाख रुपये किमतीचे कामे देण्याची मागणी करण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)