विद्यार्थिनींना बस बाहेर काढले
By Admin | Updated: August 7, 2016 00:46 IST2016-08-07T00:46:18+5:302016-08-07T00:46:18+5:30
येथून जवळच असलेल्या पुरड बसबस्थानकावर लहान विद्यार्थ्यांना धक्काबुक्की करून बस बाहेर काढण्यात आले. ...

विद्यार्थिनींना बस बाहेर काढले
धक्काबुक्की : चालक-वाहकाविरोधात पोलिसांत तक्रार
घुग्घुस : येथून जवळच असलेल्या पुरड बसबस्थानकावर लहान विद्यार्थ्यांना धक्काबुक्की करून बस बाहेर काढण्यात आले. विद्यार्थिनींसोबत झालेल्या प्रकारामुळे संतप्त होऊन पालकांनी शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
खेड्यापाड्यात राहणारा प्रत्येकजण शिक्षणाच्या प्रवाहात यावा, या हेतूने राज्य शासनाने विद्यार्थ्यांकरिता मानव मिशनअंतर्गत एस.टी. बसेस उपलब्ध केल्या आहेत. परंतु अवेळी धावणाऱ्या एस. टीे. बसेसमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
सत्र सुरू होऊनही शाळा संपल्यानंतर नायगाव येथे जाण्यासाठी बस उपलब्ध नसल्याने कोणत्याही भौतिका सुविधा नसलेल्या घुग्घुस बसस्थानकावर विद्यार्थिनींना रात्री ७.३० वाजेपर्यंत बसची वाट पाहत राहावे लागते. त्यामुळे त्यांना घरी जाण्यास रात्री ९ वाजतात. नायगावला जाण्याकरिता बस उपलब्ध करून द्यावी म्हणून आगार व्यवस्थापक, पालकमंत्री व इतर लोकप्रतिनिधींना निवेदने दिलीत. परंतु काहीही उपयोग झाला नाही. वाहक व चालकाने धक्काबुक्की करून दूरवर विद्यार्थिनींना उतरवून दिल्याने संताप व्यक्त केला जात असून गावाला जाण्याकरिता बस उपलब्ध न झाल्यास रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा विद्यार्थिनी सोनाली झाडे, यशश्री हरणे, अंजू बोबडे, दीक्षा मिलमिले, कोमल बोकडे यानी दिला आहे. तसेच उसगावच्या विद्यार्थिनींना सकाळी शाळेत जाण्यासाठी एकमेव बस उपलब्ध असून परतीचा प्रवास करताना सायंकाळी ५.३० वाजता बस उपलब्ध नाही. त्यामुळे त्या विद्यार्थिनींना परतीच्या बसची प्रतीक्षा आहे. उसगावसाठी सायंकाळी ५.३० वाजता घुग्घुसवरुन बस उपलब्ध करावी अशी मागणी उसगावच्या सरपंचांनी केली आहे. (वार्ताहर)
घडलेला घटनाक्रम संतापजनक
३० जुलैला सकाळ पाळीतील विद्यार्थिनी एमएच ४०एन ८७९७ क्रमांकाच्या बसने शाळा आटोपून नायगावला परत जात असताना वाहकाने विद्यार्थिनींना बेल्लारा फाट्यावर उतरविण्याचा प्रयत्न केला. त्यावर विद्यार्थिनींनी नकार देताच चालक-वाहकाने पाच किमी पुढील पुरड बसस्थानकावर बस थांबवून आत बसलेल्या विद्यार्थिनींना धक्काबुक्की करून खाली उतरविले.