विवाहासाठी मुलींनाही हवा आता जमीनधारक पती
By Admin | Updated: December 25, 2015 00:24 IST2015-12-25T00:24:26+5:302015-12-25T00:24:26+5:30
विवाह हा प्रत्येकांच्या आयुष्यातील सुखाचा, आनंदाचा क्षण. आपल्या मुलीला भावी आयुष्याचा चांगला जोेडीदार मिळावा ही प्रत्येक आई- वडिलांची इच्छा असते.

विवाहासाठी मुलींनाही हवा आता जमीनधारक पती
मुलाकडे सातबाराची अट : बदलत्या काळात विवाहाचे संदर्भही बदलले
प्रकाश काळे गोवरी
विवाह हा प्रत्येकांच्या आयुष्यातील सुखाचा, आनंदाचा क्षण. आपल्या मुलीला भावी आयुष्याचा चांगला जोेडीदार मिळावा ही प्रत्येक आई- वडिलांची इच्छा असते. मुलगी सुखा- समाधानात राहावी यासाठी पिलाची धडपत सुरू असते. मात्र हे सारे पाहताना मुलाकडे जमिनी एक तुकडा असावा अशी अट मुलींनीही घातली असल्याने बदलत्या काळात विवाहाचे संदर्भही बदलत चालले आहे.
विवाह म्हटला तर आनंदाची पर्वणीच लग्नातील माहोल हा अनेकांना वेगळाच आनंद देऊन जातो. पूर्वी लग्नाची पद्धत वेगळी होती. आई- वडिलांच्या पसंतीवरच मुलीच्या भावी जोडीदारासोबत साता जन्माची रेशमी गाठ बांधावी लागत होती. त्यावेळी मुलीची पसंती विचारात घेतली जात नव्हती. आई-वडिलांनी जो वर निवडला आहे, त्याच्याशी लग्न लावून दिल्या जात होते. मुलगीही वडिलांच्या शब्दाबाहेर जात नसल्याने दिल्या घरी सुखी राहत होती. मात्र आज काळ बदलला. या काळासोबत विवाहाचे संदर्भ बदलत चालले आहेत. व्हॉटसअॅप फेसबुकच्या जगात तरुणाईचे भावविश्व वेगळे आहे. आपली मुलगी आयुष्यभर सुखात राहावी हे प्रत्येक आई- वडिलांचे स्वप्न असते. मात्र बदलत्या काळात मुलींच्याही भावनांचा विचार करीत तिला तिच्या पसंतीचा जोडीदार निवडण्याची संधी घरच्यांनी दिली आहे. विवाहासाठी सज्ज झाल्यानंतर मुलांचे घरदार, नोकरी याला पहिली पसंती असायची. परंतु मुलांकडे आता घरदार, संपत्ती आणि नोकरीच असून चालत नाही. तर त्याच्याकडे जमिनीचा कोरभर तुकडा असावा, असा मानस आज व्यक्त होत असल्याने नोकरीसोबत मुलांकडे सातबाराची अट मुलींकडून घातली जात आहे. तुळशी विवाहानंतर विवाहासाठी, साक्षगंध व पाहणीचे कार्यक्रमाचे मोठ्या लगबगीने पार पाडले जात आहे. मुलाकडील व मुलींकडील मंडळ पाहणीच्या कार्यक्रमात व्यस्त झाली आहेत. मुलगी आयुष्यभर सुखात राहावी. यासाठी वधूपित्याची धडपड चालली आहे. विवाह एकदाच होत असल्याने मुलींसाठी चांगले स्थळ पाहण्यासाठी सुरुवात झाली आहे.
लग्न जुळवून बऱ्यापैकी आता लग्नालाही सुरुवात झाली आहे. भावी जोडीदारासोबत विवाह करण्यासाठी मुलींची पसंती आता विचारात घेतली जात आहे. त्यामुळे काळाच्या ओघात लग्नाची प्रक्रीया हळूहळू बदलत जात आहे. भावी जोडीदार निवडीचे स्वातंत्र्य मुलींना मिळाले असले तरी घरातील वडिलाच्या शब्दाबाहेर मुलगी आजही जात नाही, हे वास्तव आजही कायम आहे. लाडात वाढविलेली लेक परक्या घरी देताना मुलगी आयुष्यभर सुखात राहावी हिच आई- वडिलांची माफक इच्छा असते. मुलाकडील किंवा मुलीकडील घराणेशाहीला आजही तितकीच पसंती दिली जाते. घराणेशाहीच्या बळावर आजही विवाह उरकले जाते. ही पुरातन काळापासून चालत आलेली प्रथा कायम आहे.
काळ बदलल्याने काळासोबत माणसाला बदलावे लागते. हा एक नियम आहे. त्यानुसार विवाह सोहळ्यातही मोठ्या प्रमाणात अमुलाग्र बदला झाला आहे. आजच्या काळात नोकरी आणि विवाह हे समीकरण तयार झाले आहे. परंतु नोकरीसोबतच मुलांकडे जमिनीचा सातबारा असावा हा नवा विचार जनमानसात चांगला रुढ होत चालला आहे. त्यामुळे भावी नववधू, भावी वराकडे सातबारा असावा अशी अट घालत असल्याचे चित्र समाजात पहायला मिळत आहे.