तरुणीवर अत्याचार करून खून
By Admin | Updated: March 16, 2016 08:35 IST2016-03-16T08:35:21+5:302016-03-16T08:35:21+5:30
चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर सन्मित्र सैनिकी शाळेच्या आवार भिंतीजवळ एका १८ ते २० वयोगटातील अज्ञात तरुणीवर अत्याचार करण्यात आला.

तरुणीवर अत्याचार करून खून
पुन्हा एका निर्भयाचा बळी : बल्लारपूर-चंद्रपूर मार्गावर जंगलातील घटना
बल्लारपूर : चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर सन्मित्र सैनिकी शाळेच्या आवार भिंतीजवळ एका १८ ते २० वयोगटातील अज्ञात तरुणीवर अत्याचार करण्यात आला. अत्याचारी एवढ्यावरच थांबले नाही तर तिच्या गळ्यावर, चेहऱ्यावर व छातीवर शस्त्राने वार करून तिचा निर्घृण खून केला. ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजता उघडकीस आली. पुन्हा एकदा नराधमांच्या वासनेला एका निर्भयाला बळी पडावे लागल्याच्या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे.
बल्लारपूर तालुक्याच्या विसापूर हद्दीत सन्मित्र सैनिकी शाळा चंद्रपूर- बल्लारपूर राज्य महामार्ग २५४ वर आहे. या शाळेच्या आवार भिंतीजवळ निर्जनस्थळी अनोळखी २० वर्षांच्या तरुणीवर सोमवारी रात्रीच्या सुमारास नराधमांनी अत्याचार केला. वासनेची भूक शमविल्यानंतर तिचा जीवही घेतला. तद्नंतर रस्त्यापासून जवळपास १०० ते १५० मीटरपर्यंत तिचा मृतदेह जंगलात नेऊन पालापाचोळ्याने झाकून ठेवला. सदर बाब सन्मित्र सैनिकी विद्यालयात विद्यार्थ्यांच्या लक्षात मंगळवारी सकाळी आली. येथील शिक्षकांनी घटनेची माहिती बल्लारपूर पोलीस ठाण्याला कळविली.
घटनेची माहिती होताच बल्लारपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप सिरस्कर पथकासह घटनास्थळी धावले. घटनास्थळ रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी गाठले. रामनगर व बल्लारपूर पोलीस ठाण्याचा ताफा घटनास्थळावर आल्याने ये-जा करणाऱ्यांनाही उत्सुकतेपोटी थांबावे लागल्याने घटनास्थळी मोठी गर्दी झाली. पोलिसांनी श्वानपथकाच्या माध्यमातून आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्याप धागेदोरे गवसले नाहीत. तपास कार्यात व्यत्यय येऊ नये म्हणून पोलिसांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना घटनास्थळाजवळ जाण्यास मज्जावही केला.
विशेष म्हणजे अज्ञात तरुणीवर अज्ञात आरोपीने बळजबळीने अत्याचार केला असावा, अत्याचार केल्यावर आपले दुष्कृत्य लपविण्यासाठी त्याने गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या स्पष्ट खुणा दिसत असून रक्त वाहत असल्याचे दिसून येत होते. सदर तरुणी तेलगू भाषिक असावी, असा पोलिसांनी अंदाज वर्तविला आहे. घटनेचा पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी तरूणीचा मृतदेह चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. बल्लारपूर-चंद्रपूर राज्य महामार्गावरील या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधिकारी हेमराजसिंह राजपुत, पोलीस उपअधीक्षक जयचंद्र काळे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सुशीलकुमार नायक, रामनगरचे ठाणेदार एस.बी. चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक वनमाला पारधी यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. (शहर प्रतिनिधी)