सास्ती : मकरसंक्रांतीच्या दिवशी महिला वाण म्हणून वेगवेगळ्या वस्तू एकमेकांनी भेट म्हणून देतात. मात्र राजुरा तालुक्यातील चनाखा येथील एक मोकळा श्वास कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्रात मकरसंक्रांतीच्या पर्वावर परंपरेला फाटा देत ‘वृक्ष लावा, आयुष्य वाचवा’ या संकल्पनेखाली महिलांना वाण म्हणून वृक्षाची रोपे भेट देण्यात आली.
चनाखा येथील मोकळा श्वासचे संचालक रिंकू मरस्कोल्हे, नितीन मुसळे, रूपेश शिवणकर, सुहास आसेकतर यांनी कृषी पर्यटन केंद्राच्या निमित्ताने ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पर्यावरणाचा समतोल ढसळत चालला आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने पर्यावरणाला बाधा पोहोचली आहे. मकरसंक्रांतीच्या पर्वावर महिला वाण म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या संसारोपयोगी वस्तू भेट म्हणून एकमेकींना देतात. परंतु या परंपरेला फाटा देत सामाजिक बांधिलकीसाठी पर्यावणाचे भान राखत येथील शुभांगी मुसळे, ऊर्मिला मरस्कोल्हे, कांचन आसेकर यांनी मकरसंक्रांतीच्या दिवशी महिलांना वाणाची भेट म्हणून वृक्षाचे रोप देऊन एक आगळा-वेगळा उपक्रम राबविला.