सहा वर्षांपूर्वी ताटातूट झालेल्यांची घालून दिली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:23 IST2021-01-14T04:23:11+5:302021-01-14T04:23:11+5:30
घनश्याम नवघडे नागभीड : खाकी वर्दीतील माणूस कितीही चांगला असू द्या, पण खाकी वर्दी म्हटले की, लोक त्यांच्यापासून थोडे ...

सहा वर्षांपूर्वी ताटातूट झालेल्यांची घालून दिली भेट
घनश्याम नवघडे
नागभीड : खाकी वर्दीतील माणूस कितीही चांगला असू द्या, पण खाकी वर्दी म्हटले की, लोक त्यांच्यापासून थोडे लांबच राहण्याचा प्रयत्न करतात. पण, याच खाकी वर्दीतील माणसात एक सहृद माणूसही असतो, याची प्रचीती एखाद्यावेळी येत असते. अशीच एक प्रचीती तळोधीचे ठाणेदार रवींद्र खैरकर यांनी नुकतीच दिली.
जम्मू-काश्मीर येथून सहा वर्षांपूर्वी घर व कुटुंबीयांपासून दूर गेलेल्या एका व्यक्तीची भेट घडवून आणली. खैरकर यांच्या या कामाची चांगलीच प्रशंसा होत आहे.
त्याचे झाले असे की, तळोधी पोलीस ठाण्याच्या परिसरात एक वेडसर व्यक्ती रोजच फिरत असल्याचे तळोधीचे ठाणेदार रवींद्र खैरकर यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या व्यक्तीवर नजर ठेवली. एक दिवस त्या व्यक्तीबद्दल चौकशी केली असता, ती काहीच बोलत नसल्याचे निदर्शनास आले. यावर उपाय म्हणून ठाणेदार खैरकर यांनी सदर व्यक्तीच्या हाती कागद व पेन दिला. यावरून त्या व्यक्तीचे नाव भारत भूषण स्वर्णसिंग असल्याचे समजले. एवढेच नाही तर तो वाॅर्ड नंबर २, कश्मिरी गल्ली, तहसील अखनूर जिल्हा जम्मू येथील असल्याचे समजले. सहा वर्षांपूर्वी वेडाच्या भरात तो वाट मिळेल तिकडे फिरत होता. असाच फिरतफिरत पोलीस स्टेशन तळोधी येथे आला व पोलीस ठाण्याच्या परिसरात फिरू लागला. बऱ्याच दिवसांपासून त्याने अंघोळ केली नव्हती. कपडे पूर्ण मळले होते. दाढी, केस वाढले होते. ठाणेदार खैरकर यांनी त्यास अंघोळ घालून दिली. त्याची दाढी-कटिंग करून नवीन कपडे घालून दिले. ठाणेदार खैरकर यांनी अगोदरच मोठ्या कौशल्याने त्याचे नाव व पत्ता प्राप्त करून घेतला होता. त्या पत्त्यावर अखनूर येथील पोलीस ठाण्याशी संपर्क केला. पण, सदर व्यक्ती हरवल्याची कुठलीही नोंद नव्हती. पण, अखनूर येथील अधिकाऱ्यांना सदर व्यक्तीविषयी माहिती घेण्याची विनंती केली. या व्यक्तीविषयी अखनूर येथून माहिती प्राप्त केल्यानंतर खैरकर यांनी त्याच्या नातेवाइकांशी संपर्क केला. ओळख पटल्यानंतर त्याचे नातेवाईक तळोधी येथे आले व सहा वर्षांपूर्वी ताटातूट झालेल्या त्या वेडसर व्यक्तीस सोबत घेऊन गेले.