घुग्घुसची बाजारपेठ कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 05:00 IST2020-07-27T05:00:00+5:302020-07-27T05:00:55+5:30
रविवारी सर्व व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठाने बंद ठेवली. कधी नव्हे ते रविवारी घुग्घुसचे रस्ते निर्मनुष्य दिसून आले. दरम्यान, वेकोलिच्या इंदिरानगर व रामनगर वसाहतीमधील बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची सोमवारपासून तपासणी सुरू करण्यात येणार आहे,अशी माहिती येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. वाकदकर यांनी लोकमतला दिली.

घुग्घुसची बाजारपेठ कडकडीत बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
घुग्घुस : वेकोलिच्या कामगार वसाहतील दोन वेगवेगळ्या कामगार नगरामध्ये तीन कोरोनाबाधित आढळून आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. सरपंचांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून घुग्घुस येथील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रविवारी व्यापारपेठ कडकडीत बंद होती. रस्ते निर्मुनष्य झाले होते.
वेकोलिच्या इंदिरानगर व रामनगर कामगार वसाहतीमधील तीन जण बाधित निघाल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, चंद्रपूरचे तहसीलदार निलेश गौंड, वेकोलि सबएरीया मॅनेजर पिसा रेड्डी, भाजपा जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे, शहर अध्यक्ष विवेक बोढे, प्रभारी सरपंच नुने, ग्रामविकास अधिकारी चंद्रहास नागदेवते, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जयस्वाल, तलाठी दिलीप पिल्लई व मंडल अधिकारी नवले यांनी वेकोलिच्या दोन्ही वसाहतीमध्ये येऊन सर्वेक्षण केले. इंदिरानगर वसाहतीतील ५८ क्वार्टर व रामनगर येथील आठ क्वार्टर सील करण्याचे निर्देश तहसीलदार गौंड यांनी दिले.
सरपंच संतोष नुने व माजी जि.प.अध्यक्षांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी घुग्घुस व कॉलरी परिसरातील सर्व दुकाने दोन दिवस बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रविवारी सर्व व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठाने बंद ठेवली. कधी नव्हे ते रविवारी घुग्घुसचे रस्ते निर्मनुष्य दिसून आले. दरम्यान, वेकोलिच्या इंदिरानगर व रामनगर वसाहतीमधील बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची सोमवारपासून तपासणी सुरू करण्यात येणार आहे,अशी माहिती येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. वाकदकर यांनी लोकमतला दिली. या बंदमुळे नागरिकांच्या मनातही भीतीचे वातावरण पसरले असून नागरिक रविवारी घराबाहेर पडलेच नाही.