घुग्घूस, पोंभूर्णा बसस्थानक कात टाकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 22:16 IST2018-05-25T22:16:26+5:302018-05-25T22:16:40+5:30
राज्याचे अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्हयातील घुग्घूस आणि पोंभूर्णा येथे अत्याधुनिक बसस्थानकांचे बांधकाम करण्यात येणार असून घुग्घूस येथे आठ कोटी १८ लाख ७० हजार १५० रू. तर पोंभूर्णा येथे सहा कोटी ४८ लाख २४ हजार १८२ रू. किमतीचे बसस्थानकांचे बांधकाम करण्याच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

घुग्घूस, पोंभूर्णा बसस्थानक कात टाकणार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्याचे अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्हयातील घुग्घूस आणि पोंभूर्णा येथे अत्याधुनिक बसस्थानकांचे बांधकाम करण्यात येणार असून घुग्घूस येथे आठ कोटी १८ लाख ७० हजार १५० रू. तर पोंभूर्णा येथे सहा कोटी ४८ लाख २४ हजार १८२ रू. किमतीचे बसस्थानकांचे बांधकाम करण्याच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
घुग्घूस येथील बसस्थानकाची पुनर्बांधणी करण्यात येणार असून पोंभूर्णा येथे नव्या बसस्थानकाचे बांधकाम करण्यात येणार आहे. आमदार नाना श्यामकुळे आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी घुग्घूस येथे अत्याधुनिक बसस्थानकाचे बांधकाम करण्याची मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती व त्या माध्यमातून अर्थमंत्र्यांनी ही मागणी पूर्णत्वास आणली आहे.
पोंभूर्णा येथील नागरिकांना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभूर्णा येथे अत्याधुनिक बसस्थानक प्रवाशांसाठी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन दिले होते. त्यांनी जाहीरपणे दिलेला शब्द पूर्णत्वास येत आहे. या दोन्ही बसस्थानकाच्या ठिकाणी इमारत, फर्निचर, पाणी पुरवठा व सांडपाणी व्यवस्था, विद्युत व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था, वाहनतळ बांधकाम, सोलर पॅनेल लाईटिंग, धूप प्रतिबंधक व्यवस्था, विंधन विहीर व पंप हाऊस बांधकाम आदींचे बांधकाम करण्यात येणार आहे.
त्या माध्यमातून अत्याधुनिक बसस्थानकाचे जनतेचे स्वप्न पूर्णत्वास येणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर, बल्लारपूर, मूल या शहरांमध्ये मंजूर अत्याधुनिक बसस्थानकांची बांधकामे प्रगतीपथावर आहेत. लवकरच ते जनतेच्या सेवेत येतील.