घोडाझरी पर्यटन स्थळाचा ‘लूक’ बदलला

By Admin | Updated: June 3, 2017 00:34 IST2017-06-03T00:34:56+5:302017-06-03T00:34:56+5:30

पूर्व विदर्भात एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध पावलेल्या घोडाझरीने आणकी कात टाकली आहे.

Ghodazari changed the tourist spot 'Look' | घोडाझरी पर्यटन स्थळाचा ‘लूक’ बदलला

घोडाझरी पर्यटन स्थळाचा ‘लूक’ बदलला

पर्यटकांची गर्दी : विविध विकास कामे मार्गी
घनश्याम नवघडे । लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : पूर्व विदर्भात एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध पावलेल्या घोडाझरीने आणकी कात टाकली आहे. घोडाझरीत अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या असून या सुधारणा पर्यटकांना भूरळ घालत आहेत. खरोखरच घोडाझरीचा चेहरा मोहराच बदलून गेला आहे.
तसेही घोडाझरीचे नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना भूरळ घालणारेच आहे. तिन्ही बाजूला नैसर्गिक टेकड्या असल्याने एका बाजूला बांध घालून इंग्रजांनी या तलावाची निर्मिती १९०५ मध्ये केली. तलावाची निर्मिती केली त्यावेळी परिसरातील शेतकऱ्यांना सिंचन उपलब्ध व्हावे, अशी इंग्रजांची कल्पना असावी. पण आता हे तलाव नागभीड-सिंदेवाही या तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीस सिंचन तर उपलब्ध करून देत आहेच, पण त्याच बरोबर हे तलाव पूर्व विदर्भातील एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास आले आहे आणि म्हणूनच वर्षभर नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यातील पर्यटक येथे भेट देत असतात. तसेच जिल्ह्यातील शाळांच्या सहलीही येथे येत असतात.
सद्यस्थितीत घोडाझरीच्या व्यवस्थापनाने घोडाझरीत आणखी नव्याने अनेक सोयी उपलब्ध केल्या आहेत. यात विविध प्रकारच्या बोटींगचा समावेश आहे. आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे. आतापर्यंत नसलेली निवासाची सोय, आकर्षक झाडांची लागवड करण्यात आली आहे. विशाल अशा तलावाच्या आणि त्यासमोरील हिरव्या गर्द वनराईचा बसून मनमुराद आनंद लुटता यावा, यासाठी गवताच्या झोपड्यांची निर्मिती करण्यात आली आहे. गेस्ट हाऊसचाही जीर्णेोद्धार करण्यात आला आहे.
घोडाझरीचे बदललेले हे स्वरूप खरोखर डोळ्यात साठवण्याजोगे आहे. आता तर महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाकडून ‘इको टुरीझम’ म्हणून घोडाझरीचा संपुर्ण जंगल परिसर विकसीत करण्यात येत आहे. वनविभागाचे हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. वनविभागाच्या या इको टुरीझमने पर्यटकांना अनासायास दुग्धशर्करा योगाचा लाभ होणार आहे. येथे एकाच दिवशी जंगलभ्रमंती होणार असून या जंगमभ्रमंतीत जंगली पशुपक्षांचे दर्शन आणि घोडाझरीच्या नैसर्गिक सौंदर्याचे दर्शन पर्यटकांना अनुभवता येणार आहे.

घोडाझरी-कोरंबी हे अंतर ७ कि.मी.चे आहे. सध्या हा रस्ता कच्चा आहे. ‘इको टुरीझम’च्या माध्यमातून हा रस्ता विकसित करण्यात आला, तर या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढू शकते. कारण हे जंगल घनदाट असून येथे प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि या निमित्ताने घोडाझरी आणि कोरंबीलाही महत्त्व प्राप्त होईल.
- केशव खंडाते
माजी उपसरपंच, कोरंबी.

Web Title: Ghodazari changed the tourist spot 'Look'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.