शासनाची घरकुलसंदर्भात प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना आदी योजना घरकुल बांधण्यासंदर्भात आहेत. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना विविध ठिकाणांवरून घर बांधण्याचे सामान खरेदी करावे लागते. तसेच घरकुलाचे धनादेश उशिरा प्राप्त होत असल्याने घर बांधकाम उशिरा होत होते. हा त्रास कमी करण्यासाठी शासनाने घरकुल मार्ट योजना सुरू केली. या योजनेंतर्गत एकाच छताखाली विटा, सिमेंट, सळाक, तार, खिळे, शौचालय सीट, खिडकी आदी साहित्य मिळणार आहे. त्यामुळे एका ठिकाणावरून गुणवत्तापूर्ण साहित्य मिळणार असल्याने घरकुल लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न लवकर पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
चिमूर तालुक्यातून या योजनेंतर्गत फक्त शंकरपूर ग्रामपंचायतचा अर्ज प्राप्त झाल्याने ही योजना कार्यान्वित करण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रपूर प्रकल्प संचालकाने गट विकास अधिकारी यांना पत्र पाठवून योजना सुरू करून तात्काळ अहवाल सादर करावा, अशा आशयाचे पत्र ग्रामपंचायतला प्राप्त झाले आहे.
कोट
शंकरपूर ग्रामपंचायतचे घरकुल मार्ट सुरू करण्यासंदर्भात अर्ज प्राप्त झाला होता. त्यानुसार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांनी अहवाल मागितला आहे. ही योजना सुरू करण्यासाठी ग्रामसेवक यांना माहिती दिली आहे.
- संजय पुरी, गटविकास अधिकारी, चिमूर.