घुग्घुस ते वर्धा नदीपर्यंतचा मार्ग ठरतोय मृत्युकुंड
By Admin | Updated: October 11, 2015 02:20 IST2015-10-11T02:20:30+5:302015-10-11T02:20:30+5:30
येथील बसस्थानकापासून बेलोरा नायगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून चौपदरीकरणाचे काम कासवगतीने सुरू आहे.

घुग्घुस ते वर्धा नदीपर्यंतचा मार्ग ठरतोय मृत्युकुंड
प्रशासनाचे दुर्लक्ष : लोकप्रतिनिधीही सुस्त
घुग्घुस : येथील बसस्थानकापासून बेलोरा नायगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून चौपदरीकरणाचे काम कासवगतीने सुरू आहे. रस्त्यावरून अहोरात्र जडवाहनाबरोबर अन्य वाहनांची वाहतूक सुरू असते. मात्र सदर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दररोज अपघात घडत असल्याने सध्या हा रस्ता मृत्युकुंडच ठरत आहे.
घुग्घुस ते पडोलीपर्यंतच्या मागाच्या चौपदरीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र घुग्घुस बसस्थानक ते पुढे वर्धा नदीवरील पुलापर्यंतचे काम अधून-मधून केले जात आहे. रस्त्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने वाहनचालकाला खड्डयातून रस्ता शोधावा लागत आहे. रस्त्यावरून अधिकांश दुचाकी वाहनाने वेकोलिच्या कामगारांची वर्दळ आणि जडवाहनांची वाहतूक सुरू असते. या वाहतुकीमुळे रस्त्यावरील कोळशाची धूळ मोठ्या प्रमाणावर वातावरणात पसरते. त्यामुळे वाहनांच्या मागे असलेल्या वाहनचालकांना रस्ता दिसत नाही. आणि त्यातही खडयातून चालकांना रस्ता शोधावा लागत असल्याने दुहेरी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रात्री-बेरात्री वेकोलिच्या कामगाराना व त्या रस्त्यावरून वणीकडे जाणाऱ्या दुचाकी वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
वर्धा नदीच्या पुलावरील खड्डे व त्या पुलाच्या देखरेखीकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी डोळेझाक करीत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. (वार्ताहर)