मूलच्या रुग्णालयात पाण्यासाठी बोंबाबोंब
By Admin | Updated: April 2, 2015 01:27 IST2015-04-02T01:27:19+5:302015-04-02T01:27:19+5:30
मूल शहराबरोबरच तालुक्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता १ कोटी ६५ लाख रुपये खर्च करुन ५० खाटांचे श्रेणीवर्धन उपजिल्हा रुग्णालय मूल येथे बांधण्यात आले.

मूलच्या रुग्णालयात पाण्यासाठी बोंबाबोंब
मूल : मूल शहराबरोबरच तालुक्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता १ कोटी ६५ लाख रुपये खर्च करुन ५० खाटांचे श्रेणीवर्धन उपजिल्हा रुग्णालय मूल येथे बांधण्यात आले. मात्र या रूग्णालयाला विविध समस्यांनी ग्रासले आहे. रूग्णालयात पाण्यासाठी रूग्णांची बोंब सुरू असून सात अधिकाऱ्यांचे पदे मंजूर असताना केवळ दोन अधिकारी रूग्णालयाचा कारभार पाहत आहेत. त्यामुळे आरोग्य सेवेचे तीन तेरा वाजले आहेत.
रुग्णालयाचे उद्घाटन तत्कालीन आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबतच रुग्णालयात सर्व सुविधा पुरविण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र १३ वर्षाचा कालावधी लोटला असतानाही वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे आजही रिक्त आहेत. रुग्णालयात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात भासत असून एकमेव विहीर कोरडी पडली आहे. विहिरीला ट्रँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे रुग्णांची वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबरच पाण्यासाठी रूग्णांची भटकंती होत असल्याचे विदारक चित्र येथे पाहायला मिळत आहे.
येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक- १ व वैद्यकीय अधिकारी-७ असे आठ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. मात्र वैद्यकीय अधीक्षक पद गेल्या अनेक वर्षापासून रिक्त आहे.
वैद्यकीय अधीक्षकाचा प्रभार एका डॉक्टरकडे तर दुसऱ्या डॉक्टरकडे वैद्यकीय अधिकाऱ्याचा प्रभार असल्याने दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना ५० खाटांच्या रुग्णालयाचा डोलारा सांभाळावा लागत आहे. (तालुका प्रतिनिधी)