ब्रह्मपुरीतील गौरव पेपर मिल बंद होणार

By Admin | Updated: June 13, 2015 01:28 IST2015-06-13T01:28:02+5:302015-06-13T01:28:02+5:30

तालुक्यातील एकमेव उद्योग गौरव पेपर मिल ब्रह्मपुरी- वडसा मार्गावर वैनगंगा नदीच्या किनारी आहे.

Gaurav Paper Mill of Brahmapuri will be closed | ब्रह्मपुरीतील गौरव पेपर मिल बंद होणार

ब्रह्मपुरीतील गौरव पेपर मिल बंद होणार

संचालकांचे अधिकाऱ्यांना पत्र : ७८ कामगारांचे भवितव्य अंधारात
ब्रह्मपुरी : तालुक्यातील एकमेव उद्योग गौरव पेपर मिल ब्रह्मपुरी- वडसा मार्गावर वैनगंगा नदीच्या किनारी आहे. उद्योगामुळे तालुक्याची शान होती. परंतु, संचालकांनी २४ जूनपासून उद्योग बंद करण्याविषयी अधिकाऱ्यांना तसेच युनियनच्या प्रमुखाला पत्र दिले आहे. त्यामुळे ७८ कामगारांचे भवितव्य अंधारात येण्याची शक्यता असून त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे.
गौरव पेपर मिलमध्ये मागील २० ते २५ वर्षापासून कागद बनविण्याचा उद्योग सुरू आहे. पूर्वी स्थानिक तसेच इतर राज्यातील कामगार कार्यरत होते. संचालकांनी हळूहळू कामगार कमी केल्याने आज केवळ ७८ कामगार येथे कार्यरत आहेत. परंतु, गुरूवारी उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी यांचे नावे पत्र देऊन प्रतिलिपी सचिव गौरव पेपर मिल मजदूर सभा हरदोली, कमीश्नर आॅफ लेबर महाराष्ट्र मुंबई, डेप्युटी कमिश्नर आॅफ लेबर पुणे, इंडरशीयल कमिशनर मंत्रालय मुंबई, डी.आय.सी. चंद्रपूर यांना दिले आहे. स्थानिक पातळीवर तहसीलदार ब्रह्मपुरी, पोलीस निरीक्षक ब्रह्मपुरी, सरपंच, सचिव ग्रामपंचायत हरदोली, चिंचोली यांनाही बंद करण्याच्या संदर्भात प्रतिलिपी दिल्या आहे.
पत्रासोबत पेपर मिल बंद का करण्यात येत आहे, याचे माहितीपत्रक जोडले आहे. त्यामध्ये मागील दोन वर्षापासून पेपर मिलचे उत्पादन जास्त असूनही मागणी कमी असल्याने कंपनी तोट्यात आहे. इक्साईज ड्युटी, सिव्हीडी, व्हॅट हे २ टक्के वरून ५ टक्के वाढल्याने कंपनी तोट्यात सुरू आहे. सन २०१३-१४ व २०१४-१५ या दोन्ही वर्षात कंपनी अतिशय तोट्यात असल्याने कंपनीचे मेंटनन्स, पगार आदी देणे सोयीचे नसल्याने २४ जूनपासून पेपर मिल बंद करण्याचा व्यवस्थापनाने निर्णय घेतला असल्याचे पत्रात म्हटले आहे. त्यामुळे कामगारांत निराशेचे वातावरण पसरले आहे.
परंतु, ज्या कामगारांनी आतापर्यंत सेवा दिली, त्यांचे कुटुंब या कामावर निर्भर आहे. ज्यांनी पगाराच्या भरवशावर कर्ज घेतले, मुले-मुली शिकत आहेत अशा सर्व ७८ कुटुंबांचे पुढे काय होणार, हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थापन विरूद्ध कामगार यांच्यात काय तडजोड होते व पेपर मिल बंद करणे की सुरू ठेवणे याबाबत वेळीच घडामोडी घडून निर्णय लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. येत्या काही दिवसांत काय निर्णय काय घडामोडी घडणार याकडे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Gaurav Paper Mill of Brahmapuri will be closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.