गॅस गळतीने सिलिंडरचा भडका
By Admin | Updated: November 1, 2014 22:49 IST2014-11-01T22:49:32+5:302014-11-01T22:49:32+5:30
तालुक्यातील विसापूर येथील वॉर्ड क्रमांक तीनमध्ये एका घरी गॅसवर चहा तयार करताना अचानक गॅस गळती सुरू झाली. यामुळे सिलेंडरलाच आगीने विळखा घातला. प्रसंगावधान राखून घरातील

गॅस गळतीने सिलिंडरचा भडका
विसापुरातील घटना : नागरिकांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली
बल्लारपूर : तालुक्यातील विसापूर येथील वॉर्ड क्रमांक तीनमध्ये एका घरी गॅसवर चहा तयार करताना अचानक गॅस गळती सुरू झाली. यामुळे सिलेंडरलाच आगीने विळखा घातला. प्रसंगावधान राखून घरातील सदस्यांनी आरडाओरड केली. नागरिकांनी धाव घेऊन आगीवर नियंत्रण आणल्याने मोठी दुर्घटना टळली. ही घटना विसापूर येथे शनिवारी सकाळी ८ वाजता दरम्यान घडली.
बल्लारपूर तालुक्यात विसापूर येथील श्यामराव गेडाम यांच्या घरी शनिवारी सकाळच्या वेळी कुटुंबीय गॅसवर चहा करीत होते. नेमक्या याचवेळी गॅस गळती होऊन आगीने रौद्ररूप धारण केले. आगीच्या लोळांनी गॅस सिलिंडरला घेरले. घरच्या मंडळीने अंगणात येऊन मदतीसाठी ओरड केली. नागरिकांनी धाव घेऊन आग लागलेल्या घराचे कवेलू काढून पहिल्यांदा आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत स्वयंपाक घरातील काही साहित्य जळाले.
काही वेळाने आग नियंत्रणात आणण्याच्या बंबाने आग विझविण्यासाठी धावपळ करण्यात आली. घरी असलेल्या रेतीने जळत्या सिलिंडरला काबुत आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली. त्यावर पाण्याचा शिडकाव करण्यात आला.
बारदाणा ओला करून सिलिंडरला झाकून ठेवण्याचा प्रयत्न करीत असतानासुद्धा गॅस गळती मोठ्या प्रमाणात झाल्याने आग नियंत्रणात येत नव्हती. अखेर तब्बल तासभराच्या अथक परिश्रमानंतर नागरिकांनी लोखंडी सळाखीच्या साहाय्याने पेटता गॅस सिलिंडरला बाहेर अंगणात आणून विझविला. त्यामुळे वॉर्डातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
या घटनेत सिलिंडरचा स्फोट न झाल्याने मोठी दुर्घटना टळली. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. घटनेचा पंचनामा बल्लारपूरचे तलाठी एम.बी. कन्नाके यांनी केला. यात त्यांचे पाच ते दहा हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)