मतदार जागृतीसाठी गॅस वितरक सरसावले
By Admin | Updated: October 12, 2014 23:43 IST2014-10-12T23:43:28+5:302014-10-12T23:43:28+5:30
विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने योगदान देत आहेत. आता घरगुती गॅस वितरकांनीसुद्धा या राष्ट्रीय कार्यात उडी घेतली आहे.

मतदार जागृतीसाठी गॅस वितरक सरसावले
चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने योगदान देत आहेत. आता घरगुती गॅस वितरकांनीसुद्धा या राष्ट्रीय कार्यात उडी घेतली आहे. विविध हँडबील व पोस्टरच्या माध्यमातून मतदानाचे आवाहन त्यांच्याकडून करण्यात येऊ लागले आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गॅस वितरकाने स्वयंस्फूर्तपणे मतदारजागृती मोहिमेत सहभाग घेतला आहे. प्रत्येक घराघरांत हँडबिल, पोस्टर पोहोचविण्याचे काम ते वितरक करीत आहेत. चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सूचित केल्याप्रमाणे जिल्ह्यातील एकूण ३७ एलपीजी वितरक, १५२२ रास्तभाव दुकानदार व १८२१ केरोसीन परवानाधारकांनी तत्परतेने येत्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांना आवाहन केले आहे. त्यांच्या तालुक्यातील संघटनांनी पुढाकार घेतलेला आहे. त्यांच्याद्वारे सर्व विधानसभा मतदारसंघात पोस्टर, बॅनर्स लावलेले आहेत. हँडबिलची छपाई करुन संलग्नीत लाभार्थ्यांना त्यांचे वितरण करण्यात येत आहे. याद्वारे मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहित करीत आहेत.
ही यंत्रणा सहभागी झाल्यामुळे व जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत मतदारजागृतीकरिता प्रयत्न करीत असल्याने येत्या विधानसभेच्या निवडणुकीत नक्कीच मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याची शक्यता आहे, असे विश्वास जिल्हा पुरवाठा अधिकारी रमेश आडे यांनी व्यक्त केला.
मतदारजागृतीसाठी आज रविवारी सकाळी ७.३० वाजता महानगरपालिकेतर्फे गांधी चौक येथून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मतदान करा, हा संदेश देणारी सायकल रॅली शहरातील भागात जनजागृती करीत फिरली आदिवासी प्रकल्प विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सायकल रॅलीत सहभागी होऊन मतदार जागृतीत आणखी भर दिला.
जिल्हा प्रशासनाकडून मागील सात दिवसांपासून मतदार जागृतीवर भर दिला असून आता नागरिकही मतदानाविषयी जागृत झाल्याचे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)