लक्की ड्रा लागल्याचे सांगून फसवणूक करणारी टोळी भद्रावती पोलिसांच्या जाळ्यात
By Admin | Updated: August 6, 2014 23:45 IST2014-08-06T23:45:58+5:302014-08-06T23:45:58+5:30
भ्रमणध्वनीद्वारे फोन करून आपल्या एयरटेल कंपनीच्या क्रमांकाचा लक्की ड्रॉ मध्ये २५ लाखाची लॉटरी लागली आहे. आपणास त्यावरील टॅक्स भरण्याकरिता वेळोवेळी रक्कम द्यावी लागेल,

लक्की ड्रा लागल्याचे सांगून फसवणूक करणारी टोळी भद्रावती पोलिसांच्या जाळ्यात
भद्रावती : भ्रमणध्वनीद्वारे फोन करून आपल्या एयरटेल कंपनीच्या क्रमांकाचा लक्की ड्रॉ मध्ये २५ लाखाची लॉटरी लागली आहे. आपणास त्यावरील टॅक्स भरण्याकरिता वेळोवेळी रक्कम द्यावी लागेल, असे सांगून वेगवेगळ्या बँकेच्या खात्यातून १ लाख ३० हजार रुपयांनी गंडविणाऱ्या टोळीस भद्रावती पोलिसांनी कोलकाता येथून ताब्यात घेतले. इतर फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहे.
आयुध निर्माणी वसाहतीतील रवीन्द्रनाथ हरिपथ सरकार यांच्या पत्नीला १२ जून रोजी भ्रमणध्वनी आला. त्या भ्रमणध्वनीवर आपल्याला एअरटेल कंपनीची २५ लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. सदर रक्कम मिळविण्याकरिता आपल्याला कंपनीच्या अटींचे पालन करून करापोटी (टॅक्स) काही रक्कमेचा भरणा करावा लागेल, असे सांगून आरोपीद्वारे फोन करून १३ जूनला २५ हजार रुपये, त्याच दिवशी ३० हजार रुपये, १६ जूनला ४० हजार रुपये, त्यानंतर २९ जूनला ३५ हजार रुपये असे एकुण त्यांनी वेगवेगळ्या बँकेच्या खात्यातून १ लाख ३० हजार रुपये रकमेचा भरणा केला. मात्र १० ते १२ दिवस लोटून सुद्धा लॉटरीची २५ लाख रुपये रक्कम आपल्या बँकेच्या खात्यात जमा न झाल्याने आपली फसवणूकच झाली असावी, असे त्यांना समजल्यावर त्यांनी १३ जुलैला भद्रावती पोलीस गाठून आपली फिर्याद दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर केलेल्या तपासात ज्या खाते क्रमांकावरून रुपयांची देवाण-घेवाण झाल्याचे तपासले असता त्यांना सदर खाते हे कोलकाता बँकेतील असल्याचे दिसून आले. त्याआधारे भद्रावती पोलिसांनी कोलकाता येथे जावून बँक खातेदार आरोपी जाहीद हुसैन (२४) यासह सहभागी असलेले युसुफ मजहर उल हक (१९), मोहम्मद उमर मोहम्मद कलीम (२४) यांना ताब्यात घेतले असून अन्य आरोपी फरार आहे. आरोपींनी न्यायालयात हजर केले असता ११ आॅगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मोठ्या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता ठाणेदार पंजाबराव परघने यांनी व्यक्त केली. (शहर प्रतिनिधी)