प्रदूषणमुक्त संकल्पासाठी गणेश मंडळांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2016 00:55 IST2016-09-10T00:55:01+5:302016-09-10T00:55:01+5:30
गणेश उत्सव दरम्यान जे मंडळ गणेश स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत या उत्सवाची मूळ परंपरा अबाधित राखून ध्वनीप्रदूषण मुक्त गणेश उत्सव साजरा करण्याचा जाहीर संकल्प करतील, ...

प्रदूषणमुक्त संकल्पासाठी गणेश मंडळांचा प्रतिसाद
पोलीस दलाचे आवाहन : जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून सत्कार
चंद्रपूर : गणेश उत्सव दरम्यान जे मंडळ गणेश स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत या उत्सवाची मूळ परंपरा अबाधित राखून ध्वनीप्रदूषण मुक्त गणेश उत्सव साजरा करण्याचा जाहीर संकल्प करतील, त्या मंडळाचे स्वत: पोलीस अधीक्षक संदीप दिवाण उत्सवादरम्यान भेट देऊन त्या मंडळाचा सत्कार करतील असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गणेश मंडळाकडून प्रतिसाद मिळत आहे.
मंगलमय व भक्तिपूर्ण वातावरण निर्माण करुन सामाजिक ऐक्य अबाधित राखून आनंदोत्सव साजरा करण्याकरिता लोकमान्य टिळकांच्या स्वप्नातील गणेश उत्सवाच्या मुळ परंपरेच महत्व विषद करुन ध्वनीप्रदूषण मुक्त गणेश उत्सव साजरा करण्यात यावा, याकरिता पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या संकल्पनेतून आवाहन करण्यात आले होते. त्याकरिता प्रत्येक गणेश मंडळाने स्वत:हून या मोहीमेत सहभागी व्हावे याकरिता या प्रोत्साहनपर सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेत शहरातील व जिल्ह्यातील अनेक गणेश मंडळ दिवसेंदिवस सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. ज्यामध्ये शहरातील लहाण-मोठे व प्रतिष्ठित मंडळांनी महत्वाचा पुढाकार घेतला आहे.
या मोहिमेतंर्गत ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांनी ध्वनीप्रदूषण मुक्त गणेश उत्सव साजरा करण्याचा संकल्प करणाऱ्या शहरातील मंडळांना भेटी देऊन त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला. यामध्ये अर्थव गणेश मंडळ, आकाशवाणी रोड, चंद्रपूर तसेच चांदा औद्योगिक वसाहत महिला मंडळ चंद्रपूर या मंडळाचा समावेश होता.
मंडळाच्या सत्काराच्या वेळी अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्यासह उपविभागीय पोलीस अधीकारी प्रल्हाद गिरी, रामनगरचे ठाणेदार संपत चव्हाण, सायबर सेल प्रभारी अधिकारी विकास मुंढे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
अर्थव गणेश मंडळ, आकाशवाणी रोड, चंद्रपूर तसेच चांदा औद्योगिक वसाहत महिला मंडळ, चंद्रपूर या व्यतिरिक्त ६ सप्टेंबर पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या हस्ते शहरातील गणेश मंडळाचा सत्कार करण्यात आला.
या मोहिमेत सत्कार झालेल्या गणेश मंडळाचा इतरही गणेश मंडळांनी आदर्श घेऊन गणेश उत्सवाचा लोककल्याणकारी उद्दात हेतू साध्य होईल, ही अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून यात जिल्ह्यातील गणेश मंडळांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)