आकर्षक रोषणाईने सजला चंद्रपुरातील गणेशोत्सव
By Admin | Updated: September 6, 2016 00:40 IST2016-09-06T00:40:39+5:302016-09-06T00:40:39+5:30
सोमवारपासून जिल्हाभरात गणेशोत्सवाला सुरूवात झाली आहे. सगळीकडेच गणेशोत्सवाची धूम सुरू आहे.

आकर्षक रोषणाईने सजला चंद्रपुरातील गणेशोत्सव
भाविकांची गर्दी : दर्शनासाठी लागतात रांगा
चंद्रपूर : सोमवारपासून जिल्हाभरात गणेशोत्सवाला सुरूवात झाली आहे. सगळीकडेच गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. या धामधुमीत अनेक गणेश मंडळानी स्थापना केलेली बाप्पाची मूर्ती, रोषणाई, देखावे हे भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे.
चंद्रपूरचा राजा अशी ख्याती असलेल्या जटपुरा गेट येथील गणेश मंडळ भाविकांचे विशेष आकर्षण ठरला आहे. हे गणेश मंडळ दरवर्षीच विविध देखावे सादर करीत असते. यावर्षी मंडळाने हैदराबाद येथील ‘चारमिनारचे गेट’ तयार केले आहे. त्या खालून वाहतूक करता येते. देखावा पाहण्यासाठी दररोज भाविकांची मोठी गर्दी असते. तसेच ‘श्री’ची मूर्ती अक्षरधान मंदिराच्या प्रतिकृत ठेवली आहे.
या गणेश मंडळाने हा देखावा सादर करण्यासाठी तब्बल १३ लाख रूपयांचा खर्च केला आहे. तर येथील बाप्पाची मूर्ती २५ फूट उंच असून एवढ्या उंचीची शहरातील एकमेव मूर्ती आहे. ही मूर्ती मातीची असून मूर्तीला लावलेले रत्नहिरे मूर्तीचे विशेष आकर्षण आहे. या मूर्तीवरील ३५ मीटरचे वस्त्र बदलविण्याचे काम मंडळाचे अध्यक्ष दीपक बेले स्वत: करतात.
चंद्रपुरातील जयबजरंग गणेश मंडळाचे ५० वे वर्ष असून मोठ्या उत्साहात गणेश मूर्तीची स्थापना केली आहे. तसेच त्यांनी कारागिरांच्या हस्ते तयार केलेले मंदिर भाविकांना आकर्षित करीत आहे. तसेच शहरातील गणेश मंदीर जटपुरा गेट येथील बाल गणेश मंडळ, बाबुपेठ येथील नूतन बाल गणेश मंडळ, रामनगर येथील गणेश मंडळ, पठाणपुरा येथील गणेश मंडळ, विजय टॉकीज भानापेठ परिसरातील माता रेणुका गणेश मंडळचीही रोषणाई भाविकांसाठी विशेष आकर्षक ठरली आहे. या मंडळाने रोषणाईवरही विशेष भर दिला असून लांबवर रोषणाई लावण्यात आली आहे. त्यामुळे येथेही दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून येते. (नगर प्रतिनिधी)
निसर्ग देखावा आकर्षणाचा केंद्रबिंदू
चंद्रपुरातील पठाणपुरा परिसरात जोडदेऊळ येथील चंद्रपूरचा महाराजा गणेश मंडळाने निसर्गाचा देखावा तयार केला आहे. त्यामध्ये गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली आहे. निसर्गरम्य देखावा गणेशभक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. या देखाव्यात सळाळत पडणारे धबधब्याचे पाणी, अनेक प्रकारची वृक्षे आदी आकर्षक पद्धतीने मांडण्यात आले आहे. तसेच मदिरावर विद्युत दिव्यांनी रोषणाई करण्यात आली आहे. रस्त्याच्या दुतर्फाही लायटिंग लावण्यात आली आहे.
मंदिराच्या
प्रतिकृतीत गणराज
कस्तूरबा चौकातील जय बजरंग गणेश मंडळाचे यावर्षी ५० वे वर्ष असल्याने मोठ्या उत्साहाने गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. गणरायाला विराजमान करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे मंदिर तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये साडेनऊ फुटांची मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळानेही भक्तांचे डोळे दिपवणारा रोषणाईचा झगमगाट रस्त्याच्या दुतर्फा केला आहे. त्यामुळे या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी दिसून येत आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेली रोषणाई भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. या रोषणाईने शहरातील रस्ते उजळून निघत आहे. सायंकाळी भाविकांच्या गर्दीने रस्ते फुलून जात आहेत. अनेक गणेश मंडळांनी उभ्या केलेल्या मंडपाभोवती लहान मुलांच्या खेळण्यांची दुकानेही मोठ्या प्रमाणावर लागली आहेत. भाविक आपल्या लहानग्यांसाठी खेळणी खरेदी करीत आहेत.
चारमिनारची प्रतिकृती व अक्षरधाम मंदिर
चंद्रपूर शहरातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या जटपुरा गेट परिसरातील ‘चंद्रपूरचा राजा’ गणेश मंडळाने यावर्षी हैदराबाद येथील चारमिनारची प्रतिकृती तयार केली आहे. तसेच अक्षरधाम मंदिराच्या देखावा उभारण्यात आला आहे. या मूर्तीला ३५ मीटरचे वस्त्र लावण्यात आले आहे. रस्त्याच्या दुतर्फा छोट्या विद्युत बल्बच्या सिरिज आणि आकर्षक दिव्यांची रोषणाई करण्यात आल्याने सायंकाळी अंधार पडल्यापासून हा परिसर रोषणाईने झगमगत असतो. तसेच ठिकठिकांणी स्वागत बोर्डसुद्धा लावण्यात आले आहेत.