वाहनाच्या दिव्यात होतात मृतांवर अंत्यसंस्कार
By Admin | Updated: June 15, 2015 01:08 IST2015-06-15T01:08:06+5:302015-06-15T01:08:06+5:30
शहरालगत तीन स्मशानभूमी आहेत. मागील कित्येक महिन्यांपासून या स्मशानभूमी मुलभूत सोईसुविधांपासून वंचित आहेत.

वाहनाच्या दिव्यात होतात मृतांवर अंत्यसंस्कार
वरोरा : शहरालगत तीन स्मशानभूमी आहेत. मागील कित्येक महिन्यांपासून या स्मशानभूमी मुलभूत सोईसुविधांपासून वंचित आहेत. पालिका प्रशासनाने या सुविधाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे रात्री मृतांच्या पार्थिवावर वाहनाचे दिवे लावून अंत्यसंस्कार करावे लागत आहे. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
वरोरा शहरालगत वणी रोड, बोर्डा पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर व मालवीय वार्डात, अशा तीन स्मशानभूमी आहेत. यामध्ये पालिका प्रशासनाच्या वतीने दोन स्मशानभूमीची देखभाल केली जाते. या स्मशानभूमीमध्ये मृतदेह जाळण्यासाठी असलेले लोखंडी स्टँड केव्हाच बेपत्ता झाले आहेत. सहा महिन्यांपासून हातपंप बंद आहेत तर विद्युत दिवे मागील काही महिन्यांपासून बंद आहेत. अशा दयनीय अवस्था वणी नाक्याकडील स्मशानभूमीची झाली आहे. नगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या स्मशानभूमीची देखभाल केली जाते. परंतु मागील सहा महिन्यांपासून या स्मशानभूमीत मुलभुत सोयी कोलमडल्या आहेत. तरीही प्रशासनाने लक्ष देऊ नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रात्री अंत्यसंस्कार करावयाचे असल्यास मृताच्या आप्तेष्टांना जनरेटरची व्यवस्था, गॅसबत्ती, इमरजन्सी दिवे घेऊन जावे लागते. त्यामुळे अंत्यसंस्कार करताना मृताच्या आप्तेष्टांना अंत्यसंस्कारासाठी लागणारे साहित्य त्यासोबतच इतरही साहित्य घेऊन जावे लागत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
स्मशानभूमीतील हातपंप मागील काही महिन्यांपासून बंद आहे. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी किंवा झाल्यानंतर स्मशानभूमीमध्ये मृतावर अंत्यसंस्कार करणाऱ्या अंगावर पाणी घ्यावे लागते. स्मशानभूमीत पाणी नसल्याने पाणी असलेल्या कॅन घेऊन मृताच्या आप्तेष्टांना स्मशानभूमीत जावे लागत आहे. अशा अनेक कठीण प्रसंगांशी दोन हात करूनच मृतांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहे. (तालुका प्रतिनिधी)