दीक्षाभूमीवर आंबेडकर भवनासाठी १ कोटी ९८ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:12 IST2017-09-29T00:12:32+5:302017-09-29T00:12:44+5:30
राज्याचे वित्त आणि नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने दीक्षाभूमी चंद्रपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधकाम व परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी १ कोटी ९८ लाख १५ हजार ३०० ...

दीक्षाभूमीवर आंबेडकर भवनासाठी १ कोटी ९८ लाखांचा निधी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्याचे वित्त आणि नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने दीक्षाभूमी चंद्रपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधकाम व परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी १ कोटी ९८ लाख १५ हजार ३०० इतक्या रकमेच्या प्र्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने याबाबतचा शासन निर्णय २७ सप्टेंबर रोजी जारी केला आहे.
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दीक्षाभूमी चंद्रपूर येथे १६ आॅक्टोबर २०१६ रोजी निधी देण्याचे जाहीर केले होते. १९५६ ला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चंद्रपूर येथे तीन लाखांपेक्षा जास्त लोकांना बौध्द धर्माची दीक्षा दिल होती. या दिवसाची साक्ष म्हणून प्रत्येक वर्षी दीक्षाभूमी, चंद्रपूर येथे १५ व १६ आॅक्टोबरला धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ साजरा केला जातो.
१६ आॅक्टोबर २०१६ रोजी दीक्षाभूमी चंद्रपूर येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभात बौध्दधर्मीय नागरिकांच्या मागणीच्या अनुषंगाने वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दीक्षाभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधकाम व परिसराचे सुशोभीकरण यासाठी निधी मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार यासाठी २ कोटी रूपयांच्या मर्यादेत तत्वत: मान्यता २४ मार्च २०१७ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आली आहे.
आयुक्त समाजकल्याण पुणे यांचे मार्फत दीक्षाभूमीच्या विकासासाठी अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, चंद्रपूर यांनी दीक्षाभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधकाम व परिसराचे सुशोभीकरणाच्या सादर केलेल्या १ कोटी ९८ लाख १५ हजार ३०० इतक्या रकमेच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात सुध्दा ना. मुनगंटीवार यांनी निधी उपलबध करण्याची घोषण केली होती. ऐतिहासिक दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन व परिसर सुशोभीकरणाच्या माध्यमातून महामानवाला मोठी आदरांजली ठरणार आहे.
या निधीमुळे दीक्षाभूमीला वेगळे रूप प्राप्त होणार आहे. त्यामुळे बौद्धबांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून पालकमंत्र्यांचे आभार मानले आहे.