बल्लारपूर शहराच्या विकासासाठी निधी खेचून आणेन
By Admin | Updated: October 12, 2014 23:43 IST2014-10-12T23:43:09+5:302014-10-12T23:43:09+5:30
गेली २० वर्षे बल्लारपूर मतदार संघाच्या विकासासाठी आपण अहोरात्र परिश्रम घेतले आहे. बल्लारपूर तालुक्याच्या निर्मीतीनंतर विकासाची विविध कामे या मतदार संघात पूर्णत्वास आणली.

बल्लारपूर शहराच्या विकासासाठी निधी खेचून आणेन
चंद्रपूर : गेली २० वर्षे बल्लारपूर मतदार संघाच्या विकासासाठी आपण अहोरात्र परिश्रम घेतले आहे. बल्लारपूर तालुक्याच्या निर्मीतीनंतर विकासाची विविध कामे या मतदार संघात पूर्णत्वास आणली. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असतानाही बल्लारपूर शहरात उपविभागीय अधिकारी कार्यालय, चार कोटी रु. किंमतीचे नाट्यगृह अशी अनेक विकासकामे मंजूूर करविली. विधानसभेत यासाठी संघर्ष केला. त्या संघर्षाचे टप्पे वेळोवेळी जनतेला सादर केले. राज्यात जरी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. तरीही लोकप्रतिनिधी म्हणून आपण केलेल्या संघर्षातूनच ही विकासकामे मंजूर झाली. सत्ता राहून होत नाही तर विधायक कामांसाठी शासनाशी संघर्ष करून पाठपुरावा करावा लागतो, असे प्रतिपादन सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
राज्यात भाजपा-मित्रपक्ष युतीचे सरकार स्थापन झाल्यास केंद्र सरकारच्या सहाय्याने बल्लारपूर शहराच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांचा विशेष निधी खेचून आणू अशी घोषणा सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केली. बल्लारपूर शहरातील कॉलरी गेस्टहाऊस नजिकच्या ग्राऊंडमध्ये आयोजित जाहीर सभेत सुधीर मुनगंटीवार बोलत होते. सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री खा. हेमा मालिनी या सभेला प्रकृती कारणामुळे येऊ शकल्या नाही. या सभेत बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर जोरदार टिका केली. राज्यात समस्यांचा डोंगर उभा करण्याशिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने काहीही केलेले नाही. लोकसभेच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांना जनतेने त्यांची योग्य जागा दाखविली. विधानसभेच्या निवडणुकीतसुद्धा जनता त्यांना त्यांची योग्य जागा दाखवेन व भारतीय जनता पार्टीला पुर्ण बहुमत देत जनताच भाजपाला सत्तारूढ करेल, असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
यावेळी सभेच्या मंचावर भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपा नेते प्रमोद कडू, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस हरीश शर्मा, निलेश खरबडे, समीर केने, अजय दुबे, रेणुका दुधे, शिवचंद द्विवेदी, धर्मप्रकाश दुबे, मनीष पांडे, अॅड. रणंजय सिंह, मिना चौधरी, वैशाली जोशी, पुष्पा डंगोरे, कांता ढोके, सुशिला गांडलेवार, मिना चौधरी, वर्षा सुंचुवार, येलय्या दासरप आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना हरीश शर्मा यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टिका केली. सुधीर मुनगंटीवार यांनी मंजूर करविलेल्या विकासकामांचे श्रेय घ्यायला काँग्रेस नेहमी तयार असते. राज्यात जरी यांचे सरकार होते तरीही मुनगंटीवारांनी प्रयत्नपूर्वक पाठपुरावा करून ही विकासकामे मंजूर करविली. वेळोवेळी विधानसभेच्या माध्यमातून याबाबत केलेला पाठपुरावा व प्रयत्न यांची माहिती आजही जनतेला देण्यास तयार आहोत, असेही हरीश शर्मा यावेळी बोलताना म्हणाले. निलेश खरबडे, अजय दुबे यांचीही भाषणे झाली.