मुलभूत सुविधांसाठी मूलवासीयांची धडपड
By Admin | Updated: July 12, 2017 00:45 IST2017-07-12T00:45:31+5:302017-07-12T00:45:31+5:30
जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून मूल शहराचा कायापालट होत आहे.

मुलभूत सुविधांसाठी मूलवासीयांची धडपड
भोजराज गोवर्धन । लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून मूल शहराचा कायापालट होत आहे. परंतु स्थानिक लोकप्रतिनिधींचे विविध विकास कामांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे मूल शहराला विविध समस्यांनी ग्रासले आहे. परिणामी शहरवासीयांना मुलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे. शासनाकडून शहर विकासाठी करोडो रूपयांचा निधी मिळत आहे. या निधीचे योग्य नियोजन केल्यास विकास कामे मार्गी लागण्यास वेळ लागणार आहे. मात्र यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
१७ सदस्य असलेल्या मूल नगर पालिकेत भाजपची सत्ता आहे. १७ पैकी १६ नगरसेवक भाजपाचेच आहेत. केंद्र व राज्यातही भाजपची सत्ता आहे. यामुळेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या गृहक्षेत्रातील मूल शहराचा विकास झपाट्याने करीत आहेत. मूल शहरातील मुख्य मार्गावर प्रवेश करताच एखाद्या मोठ्या शहरात प्रवेश केल्याचा भास नागरिकांना होतो. त्या पद्धतीनेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देवून शहरातील समस्या सोडविण्यासाठी पुढाकाव घेतला पाहिजे. परंतु, तसे होताना दिसून येत नाही, यामुळेच अनेक वॉर्डात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.
अंतर्गत रस्ते, नालीची समस्या कायम असून कंत्राटदाराच्या हुकूमशाहीमुळे अनेक रस्ते व नाल्याचे काम अपूर्ण आहे. मुसळधार पाऊस येताच अनेकांच्या घरात पाणी घुसण्याची शक्यता असते. शहरात घंटागाडी फिरवून जमा केलेला कचरा बसस्थानकाजवळ जमा करण्यात येत आहे. त्यामुळे येथे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. आठवडी बाजारातील शौचालयाजवळ मागील अनेक दिवसांपासून मटन मार्केट मधील घाण इतरत्र पसरलेली आहे. यामुळे आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. यासोबतच शहरात डासांचा प्रादूर्भाव झालेले आहे. डुक्करांचा हौदोस वाढलेला असून याकडेही नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
राज्याचे अर्थ, नियोजन वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मूल शहराला विदर्भातील सुंदर व स्वच्छ शहर निर्माण करण्याचा विडा उचलला आहे. यामुळेच मूल शहरात करोडो रुपयाचे विकासकामे सुरू आहेत. शहरातील मुख्य मार्गाचा चेहरामोहरा बदललेला आहे. परंतु वॉर्डा-वॉर्डात अनेक समस्या आहेत, त्या सोडविणे महत्त्वाचे आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष देवून अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्याची आवश्यकता आहे.
तसेच मूल शहरात आरोग्य, वीज समस्या आवासून उभ्या आहेत. उपजिल्हा रुग्णालयात अस्वच्छता व कर्मचाऱ्यांच्या अरेरावीचा सामना रुग्णांना करावा लागत आहे. तांदळाची मोठी बाजारपेठ असलेल्या दूरसंचार निगमची सेवा कुचकामी ठरत आहे. वाहतूक व्यवस्थेचे तीन-तेरा वाजले असून याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. याकडे लक्ष न दिल्यास करोडे रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या रस्त्यावर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या समस्या कधी सुटणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, हीच अपेक्षा.
एसटी आगाराची मागणी धुळखात
मूल : व्यावसायिक दृष्ट्या प्रगत असलेल्या मूल शहरात बाहेरगावी ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र त्या तुलनेत एसटी बसेसच्या फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रवाशांना वेळेत एसटी बस मिळण्यासाठी मूल येथे एसटी महामंडळाचे आगार देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत असली तरी ही मागणी अद्याप पुर्णत्वास आलेली नाही.
एस.टी. महामंडळाला वर्षाकाठी लाखो रूपयांचे उत्पन्न देणाऱ्या मूल बसस्थानकावरुन एसटी बसेसच्या ३०० पेक्षा अधिकच्या फेऱ्या आहेत. मूल येथे धानाची मोठी बाजारपेठ असून शहरात न्यायालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, शाळा, महाविद्यालये, उपजिल्हा रुग्णालय, अधीक्षक तालुका भूमी अभिलेख कार्यालय तसेच इतरही सरकारी कार्यालये आहेत. त्यानिमित्ताने शासकीय कामासाठी तालुक्यातील ग्रामीण भागातून शेकडो नागरिक आणि विद्यार्थी दररोज मूल मध्ये येत असतात. आपले काम आटोपून गावाला परत जाण्यासाठी येथील बसस्थानकावर आल्यावर मात्र त्यांना तासन्तास बसची प्रतीक्षा करावी ुलागत असते. मूल शहराच्या मध्यभागी मोठे बसस्थानक असले तरी येथे येणाऱ्या बसेस या चिमूर, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, ब्रह्मपुरी येथील आगारातून येतात. त्यामुळे बस फेऱ्यांचे नियोजन त्या-त्या आगारातून होत असते. प्रवाशांना त्यांचा वेळेत बस मिळणे आवश्यक आहे. मात्र येथील बसस्थानक बसेससाठी दुसऱ्या आगारावर अवलंबून असते. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या वेळेत बस उपलब्ध करून देण्यात अडचणी येत असल्याचे येथील वाहतूक नियंत्रकाचे म्हणणे आहे.
प्रवाशांच्या बसेसची अडचण लक्षात घेता मूल येथे एसटीचे आगार होणे आवश्यक आहे. आगार झाल्यास प्रवाशांच्या संख्येनुसार त्या-त्या मार्गावर बसेस सोडण्याची व्यवस्था करता येऊ शकेल. एसटी महामंडळाने एसटी आगारासाठी मूल येथे यापूर्वीच सात एकर जागा खरेदी केल्याचे सांगण्यात येत असले तरी अद्याप मागणी पुर्णत्वास आलेली नाही.