फळविक्रेती महिला निघाली चोर

By Admin | Updated: September 24, 2014 23:27 IST2014-09-24T23:27:02+5:302014-09-24T23:27:02+5:30

वॉर्डात फिरुन फळविक्री करणाऱ्या एका महिलेने चंद्रपुरातील दोघांना लाखो रुपयांनी गंडविले आहे. चंद्रपूर शहर पोलिसांनी फळविक्री करणाऱ्या चोरट्या महिलेला सोमवारी अटक केली.

The fruit soldier was the thief of women | फळविक्रेती महिला निघाली चोर

फळविक्रेती महिला निघाली चोर

घरोघरी जाऊन विक्री : दोघांच्या घरून १ लाख ६५ हजाराची रोख व साहित्य पळविले
चंद्रपूर : वॉर्डात फिरुन फळविक्री करणाऱ्या एका महिलेने चंद्रपुरातील दोघांना लाखो रुपयांनी गंडविले आहे. चंद्रपूर शहर पोलिसांनी फळविक्री करणाऱ्या चोरट्या महिलेला सोमवारी अटक केली. तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
इंदिरा चंद्रकांत गजर (३५) रा. भिवापूर वार्ड असे अटकेतील महिलेचे नाव आहे. ही महिला शहरातील वॉर्डामध्ये घरोघरी जाऊन फळ विक्री करत होती. १९ सप्टेंबर शुक्रवारला बालाजी वॉर्ड येथील संगीता अंगत देशवाले यांनी फळ खरेदीसाठी महिलेला घरी बोलावले. संगीता यांनी फळ खरेदी करुन पैसे आणण्यासाठी त्या आतल्या खोलीत गेल्या. हीच संधी साधून त्यांच्या घरून फळविक्रेत्या महिलेने दोन हजार रुपये रोख व सोने असा ३९ हजार ६०० रुपयांचा माल लंपास केला. तर २० सप्टेंबर शनिवारला भिवापूर वॉर्ड, गवळी मोहल्ला येथील दीपक हरिदास वांढरे यांच्या घरुनही ९ हजार ५०० रुपये व सोने असा १ लाख २७ हजार रुपयाचा माल पळविला.
फळविक्रेती महिला ही फळ विकण्यासाठी वॉर्डावॉर्डात फिरत होती. त्यामुळे ती ग्राहकांच्या घरीच जाऊन फळ देत असे. याचा फायदा घेत ती त्या घरातील सामानाची व व्यवस्थेची पाहणी करुन ठेवायची. दीपक वांढरे यांच्या घरी चोरी घटनेच्या दोन ते तीन दिवसांपूर्वी साखरपुडा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात ही महिला उपस्थित होती. कार्यक्रमाची व्हिडीओ शुटींग करण्यात आली होती. यात तिचेही फोटो होते. चोरीची घटना घडल्यानंतर व्हिडीओ क्लिपच्या आधारे त्या महिलेवर घरच्यांनी पोलिसांजवळ संशय व्यक्त केला. कारण त्या महिलेला निमंत्रण नव्हते. मात्र, ती कार्यक्रमात उपस्थित होती.
फळविक्रेत्या महिलेवर यापूर्वीही रामनगर व शहर पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी वाढला. शहर पोलिसांनी सापडा रचून फळविक्रेत्या महिलेला ताब्यात घेतले. तिची चौकशी केली असता, महिलेने आपणच दोन्ही घरी चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले. यावरुन पोलिसांनी महिलेवर चोरीचा गुन्हा दाखल करुन सोमवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दीपक वांढरे यांच्या घरुन पळविलेल्या एक लाख २७ हजार पैकी एक लाख २४ हजार तर संगीता देशवाले यांच्या घरुन पळविलेल्या ३९ हजार रुपयाच्या साहित्यापैकी सोने महिलेकडून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप सिरस्कर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मुंडे, डीबी पथक प्रमुख रऊफ शेख, शिपाई प्रमोद चिंचोळकर, विनायक धुर्वे, आनंद परचाके, संजय आतकुलवार, शंकर येरमे यांनी केली. आरोपी महिलेला उद्या गुरुवारी न्यायालयात पुन्हा हजर केले जाणार आहे.
शहरात चोरीचे प्रकार वाढत आहेत. भंगार वस्तू गोळा करणारे घरी कुणीही नसल्याची संधी साधून सामान पळवून नेत आहेत. तर वस्तू विकणारेही चोरी करीत असल्याने शहरवासीयांत भीती पसरली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: The fruit soldier was the thief of women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.