संगणक परिचालकांनी विविध मागण्यांसाठी काढला मोर्चा
By Admin | Updated: September 29, 2014 23:03 IST2014-09-29T23:03:25+5:302014-09-29T23:03:25+5:30
केंद्र शासनाच्या पंचायतराज मंत्रालयाने ईपीआरआय हा प्रकल्प सर्व राज्यांमध्ये राबविला आहे. त्यानुसार सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये संगणकीकरण करणे अंतर्भूत आहे.

संगणक परिचालकांनी विविध मागण्यांसाठी काढला मोर्चा
चंद्रपूर : केंद्र शासनाच्या पंचायतराज मंत्रालयाने ईपीआरआय हा प्रकल्प सर्व राज्यांमध्ये राबविला आहे. त्यानुसार सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये संगणकीकरण करणे अंतर्भूत आहे. यासाठी संगणक परिचालक म्हणून बेरोजगार प्रशिक्षित युवकांची पदभरती करण्यात आली. मात्र कर्मचाऱ्यांचे मानधन वेळेवर दिले जात नसून थकीत ठेवण्यात आले आहे. वेतन वेळेवर द्यावे, अशी मागणी करीत संगणक चालकांनी सोमवारी मोर्चा काढत जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन दिले. दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. एवढेच नाही तर, जिल्हा परिषदेचे दोन्ही गेट बंद करून मोर्चेकऱ्यांना अडविण्यात आले.
ई-पीआरआय प्रकल्पाची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी महाआॅनलाईन कंपनीमार्फत हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या कंपनीकडून वेळेवर वेतन दिले जात नसून मुलाखतीच्या वेळी निश्चित केलेले ८ हजार ८२४ रुपये एवढे वेतन न देता केवळ ३ हजार ८०० ते ४ हजार रुपये प्रतिमहिना वेतन दिले जाते. परंतु यातही तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे संगणक चालक त्रस्त झाले आहे.
महाआॅनलाईन कंपनीकडे विनंती अर्ज करण्यात आले. त्याचबरोबर मुख्य कार्यपालन अधिकारी यांनाही लेखी निवेदन देण्यात आले. मात्र काहीही उपयोग झाला नाही. दरम्यान संगणक चालकांनी श्रमिक एल्गार संघटनेच्या नेतृत्वात आमरण उपोषण सुरु केले.
तरीही प्रशासनाने दखल घेतली नसल्याने सोमवारी महाकाली मंदिर परिसरातून मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर प्रथम जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेवर मोर्चा नेण्यात आला. श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलिल यांना निवेदन दिले. दरम्यान जिल्हा परिषद परिसरात आज मोठ्या प्र्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.
मात्र अद्यापही तोडगा निघाला नसल्याने साखळी उपोषण सुरुच ठेवण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)