शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेसचा विधिमंडळावर मोर्चा
By Admin | Updated: December 4, 2015 01:21 IST2015-12-04T01:21:05+5:302015-12-04T01:21:05+5:30
शेतकऱ्यानना कर्जमाफी, दुष्काळग्रस्तांना मदत या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने ८ डिसेंबरला नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेसचा विधिमंडळावर मोर्चा
८ डिसेंबरला आयोजन : जिल्ह्यातून कार्यकर्ते जाणार
चंद्रपूर: शेतकऱ्यानना कर्जमाफी, दुष्काळग्रस्तांना मदत या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने ८ डिसेंबरला नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यात चंद्रपूर जिल्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होत आहेत.
या मोर्चासंदर्भात माहिती देण्यासाठी चंद्रपूर महानगर काँग्रेस कमेटीचे शहर जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर यांच्यासह प्रदेश सचिव सुनिता लोढीया, माजी जिल्हाध्यक्ष सुभाष गौर, केशव रामटेके, संजय रत्नपारखी, ज्योती कवठेवर आदींच्या उपस्थितीत गुरूवारी पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलताना नंदू नागरकर म्हणाले, राज्यातील शेतकरी दुष्काळात भरडत असतानाही सरकारचे याकडे लक्ष नाही. चंद्रपूर जिल्याकतील शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. धान, सोयाबिन, कापूस उत्पादक शेतकरी संकटात आहेत. अशा वेळी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी करून आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.
राज्यातील आणि चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. गुन्हेगारी डोके वर काढत आहे. ओबीसी जनतेच्या आरक्षणाचा मुद्दा अद्यापही तसाच पडला आहे. सुनिता लोढीया म्हणाल्या, चंद्रपूर महानगर पालिकेतही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार वाढला आहे. भरमसाठ करवाढ करून सर्वसामान्य चंद्रपूरकरांवर बोझा टाकला आहे. निविदा घोटाळाही ताजाच आहे. पिण्याचे पाणीही योग्यपणे मिळत नाही. राज्यात आणि चंद्रपूर शहरात भाजपाचेच शासन आहे. तरीही अन्यायच सुरू असल्याने नागरिकांमध्ये रोष आहे.
सर्वसामान्यांच्या आहारातील तूरडाळ २०० रूपये किलोवर गेली आहे. सरकारच्या तिजोरीत पैसा वाढविण्याएवजी एलबीडी, पथकरनाके बंद करण्यात आले. त्याऐवजी नागरिकांवर अवाजवी करवाढ केली जात आहे. सर्वसामान्यांच्या आणि गरिबांच्या योजना या सरकारने बंद पाडल्या. त्यातून पैसा वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न हे सरकार करीत आहे.
सत्तेत येण्यापूर्वी दिलेली आवश्वासने पाळण्यात सरकार मागे पडले आहे. त्यामुळे जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. हा रोष व्यक्त करण्यासाठी ८ डिसेंबरच्या नागपुरातील मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या मोर्चात महिला काँंग्रेस, एनएसयूआय, युवक काँग्रेस, सेवादल यांच्यासह पक्षाच्या विविध आघाडींचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार असून सुमारे १० हजारांवर कार्यकर्ते जिल्ह्यातून सहभागी होणार असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. (जिल्हा प्रतिनिधी)