विदर्भ राज्यासाठी बीआरएसपीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By Admin | Updated: August 21, 2016 02:07 IST2016-08-21T02:07:16+5:302016-08-21T02:07:16+5:30

स्वतंत्र विदर्भाची मागणी ही फार जुनी असून स्वतंत्र विदर्भ झाल्याशिवाय विदर्भाचा विकास होणार नाही.

In front of BRSP District Collectorate for Vidarbha State | विदर्भ राज्यासाठी बीआरएसपीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

विदर्भ राज्यासाठी बीआरएसपीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

अहमद कादर : स्वतंत्र विदर्भ राज्य मिळविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
चंद्रपूर : स्वतंत्र विदर्भाची मागणी ही फार जुनी असून स्वतंत्र विदर्भ झाल्याशिवाय विदर्भाचा विकास होणार नाही. एवढेच नव्हे तर विदर्भातील शेतकरी नापिकी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करीत असून महाराष्ट्र सरकारच्या विदर्भ विरोधी भूमिकेचा परिणाम आहे. जोपर्यंत विदर्भ स्वतंत्र होणार नाही तोपर्यंत विदर्भातील शेतकरी कामगार सुखी होणार नाही त्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्य मिळविल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष अहमद कादर यांनी मोर्चाला संबोधित करताना केले.
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीतर्फे स्वतंत्र विदर्भ राज्य व अन्य मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर चंद्रपूर जिल्हा बीआरएसपीच्या वतीने मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चाला बीआरएसपीचे जिल्हा प्रभारी राजू झोडे यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी पुढे बोलताना अहमद कादर म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचे सरकार हे विदर्भ राज्यविरोधी सरकार आहे. पश्चिम महाराष्ट्र व मुंबईतील नेत्यांच्या विरोधाला बळी पडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र व केंद्रात आपल्या पक्षाची सत्ता आल्यास आपण एका वर्षाच्या आत स्वतंत्र विदर्भ राज्याची स्थापना करू, असे लिखित आश्वासन दिले. परंतु दोन वर्षांचा कालावधी लोटूनही सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्य बनविण्याच्या कोणत्याही हालचाली सुरू केल्या नाहीत. उलट विदर्भविरोधी पक्षांच्या दबावात राहून स्वतंत्र विदर्भाची मागणी करणाऱ्या पक्षांनाच दडपण्याचा प्रयत्न होत आहे.
विदर्भातील कोणत्याही पोलीस स्टेशनमधील ठाणेदार हे पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील असून अन्य विभागांमध्येही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे विदर्भातील नौजवान हा बेरोजगार होत आहे. तीच स्थिती शेतकरी व कामगारांची आहे. ही परिस्थिती पाहता स्वतंत्र विदर्भ होणे ही काळाची गरज आहे. जोपर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य होणार नाही, तोपर्यंत येथील शेतकरी व बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार नाही. त्यामुळे आपण सर्वांनीच बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या झेंड्याखाली एकत्रित येऊन संघर्ष केला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी बीआरएसपीच्या महिला जिल्हाध्यक्षा कमलाताई तुरे यांनीही आपले विचार मांडले. मोर्चात जिल्हाध्यक्ष मोनल भडके, चिमूर ब्रम्हपुरीचे जिल्हाध्यक्ष गोपाल मेंढे, महासचिव अशोक बनकर, चंद्रकांत माझी, शहराध्यक्ष विशाल रंगारी, अशोक रामटेके, अजय लिहितकर, खेमचंद मेश्राम, जे.डी. रामटेके, संजय वानखेडे, विलास गोंडाणे, महेंद्र झाडे, अभिमन्यु पिल्लेवान, न.प. उपाध्यक्ष संतोष कोरडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: In front of BRSP District Collectorate for Vidarbha State

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.