जवखेडे हत्याकांडाच्या विरोधात मोर्चा
By Admin | Updated: November 11, 2014 22:38 IST2014-11-11T22:38:10+5:302014-11-11T22:38:10+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे येथील तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ मंगळवारी विविध राजकीय, सामाजिक संघटनांच्यावतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

जवखेडे हत्याकांडाच्या विरोधात मोर्चा
चंद्रपूर : अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे येथील तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ मंगळवारी विविध राजकीय, सामाजिक संघटनांच्यावतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाची सुरूवात चंद्रपूर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून झाली. हा मोर्चा रिपब्लिकन संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. मोर्चात चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातून आलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विविध घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालावर पोहोचला. मोर्चाचे नेतृत्व रिपब्लिकन संघर्ष समितीचे खुशाल तेलंग, प्रा.एस.टी.चिकटे, अंकूश वाघमारे, प्रविण खोब्रागडे, गोपाळराव देवगडे, अॅड.सत्यजित उराडे, सिद्धार्थ वाघमारे, शंकरराव सागोरे, रमेशचंद्र राऊत, कैविशा मेश्राम, अश्विनी खोब्रागडे, राजेश वनकर, कुशल मेश्राम, जी.के.उपरे, भारत थुलकर, सुरेश नारनवरे यांनी केले.
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यानंतर तेथे या मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणातून राज्यात दलितांवर होणाऱ्या अत्याचाराच कठोर शब्दात निषेध केला. जाधव कुटुंबीयांच्या मारेकऱ्यांचा त्वरित शोध घेऊन त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, आजपर्यंतची सर्वच सरकारे दलितांवर होणारा अत्याचार रोखण्यात अपयशी ठरल्याचे सांगत वक्त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला. सभेनंतर मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांना निवेदन सादर केले. जाधव कुटुंबीयांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, अहमदनगर चे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षकांना बडतर्फ करण्यात यावे, नगर जिल्हा दलित अत्याचार जिल्हा म्हणून घोषित करण्यात यावा, आदि मागण्या शिष्टमंडळाने निवेदनातून केल्या आहेत. (प्रतिनिधी)