ठेकेदारांच्या दडपशाही विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By Admin | Updated: February 7, 2015 00:35 IST2015-02-07T00:35:15+5:302015-02-07T00:35:15+5:30
येथील जिल्हा महाऔष्णिक वीज केंद्रात ठेकेदारी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढण्यात आला.

ठेकेदारांच्या दडपशाही विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
चंद्रपूर : येथील जिल्हा महाऔष्णिक वीज केंद्रात ठेकेदारी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढण्यात आला.
मेजरस्टोर गेटपासून निघालेल्या मोर्चात २०० पेक्षा अधिक कामगार सहभागी झाले होते. मोदी शासनाचा धिक्कार असो, महाराष्ट्र शासनाचा धिक्कार असो, किमान वेतन मिळालेच पाहिजे, केंद्र तथा राज्य सरकारचे कामगार विरोधी धोरण हाणून पाडा अशा घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
येथे झालेल्या सभेत सिटूचे वामन बुटले म्हणाले, थर्मल पॉवर स्टेशनमधील कामगारांसाठी महाराष्ट्र शासनानेच किमान वेतन जाहीर केले. त्यांच्या अंमलबजावणीसाठी कामगारांना रस्त्यावर यावे लागते याची लाज महाराष्ट्र शासनाला कशी काय वाटत नाही, असा सवाल त्यांनी केला. कामगार सेनेचे शंकर बागेसर यांनी देखील सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा खरपूस समाचार घेतला.
रमेशचंद्र दहिवडे म्हणाले, निवडणुकीच्या वेळी त्यांना कामगार आठवतो, शेतकरी शेतमजुर आठवतो, दलित आदिवासी आठवतो, मात्र निवडून आल्यावरनंतर सर्वांना पायदळी कसे करता येईल, या दृष्टीने त्यांची पावले पडत असतात. कामगार कायद्यातील बदल भांडवलदारांच्या हितरक्षणासाठी होत आहे. हे कामगारांनी लक्षात घेतले पाहिजे.
या सभेनंतर वामन बुटले यांच्या नेतृत्त्वात शिष्टमंडळ निवासी जिल्हाधिकारी कुळमेथे यांना भेटले व मागण्याचे निवेदन सादर केले. कमी केलेल्या कामगारांना तात्काळ कामावर घ्या, या प्रमुख मागणीसह अन्य चार मागण्यांचा निवेदनात समावेश होता. वामन मेश्राम यांनी आभार मानले. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी पुरुषोत्तम आदे, अमोल शेंडे, अनिल वरखेडे, सुरेश देवतळे, संतोष ठाकरे, निताई घोष यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)