ज्येष्ठांच्या सुविधेसाठी लसीकरणाची मोफत ऑनलाइन नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:27 IST2021-03-19T04:27:03+5:302021-03-19T04:27:03+5:30
फोटो : ऑनलाइन नोंदणी करताना ज्येष्ठ नागरिक. चंद्रपूर : कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा १ मार्चपासून सुरू झाला असून ज्येष्ठ ...

ज्येष्ठांच्या सुविधेसाठी लसीकरणाची मोफत ऑनलाइन नोंदणी
फोटो : ऑनलाइन नोंदणी करताना ज्येष्ठ नागरिक.
चंद्रपूर : कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा १ मार्चपासून सुरू झाला असून ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केले जात आहे. मात्र, लसीकरण करण्यासाठी ऑनलाइन नावनोंदणी करणे गरजेचे आहे. मात्र, काही ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाइन नोंदणी करणे कठीण जात आहे. त्यामुळे लसीकरणापासून वंचित राहण्याची भीती त्यांना आहे. ज्येष्ठ नागरिकांचा त्रास लक्षात घेता येथील नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी मोफत ऑनलाइन नोंदणी केंद्र सुरू केले असून शेकडो ज्येष्ठांना यामुळे आधार मिळाला आहे.
१ मार्चपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. यामध्ये ६० ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ वर्षांवरील ज्यांना आजार आहे, अशांना कोरोना लसीकरण केले जात आहे. यासाठी प्रथम नावनोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी करताना काही ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांना ऑनलाइन अर्ज भरणे कठीण जात आहे. तर, काहींनी थेट सायबर कॅफेमध्ये जाऊन अर्ज भरले आहे. यामध्ये त्यांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. ज्येष्ठांची होणारी धावपळ लक्षात घेऊन त्यांना सुविधा व्हावी तसेच लसीकरण करणे सोयीचे व्हावे, यासोबतच त्यांना केंद्र तसेच लसीकरणाच्या दिवसाची तत्काळ माहिती करून देण्यासाठी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी मातोश्री शाळेजवळ मोफत ऑनलाइन नावनोंदणी केंद्र सुरू केले आहे. या केंद्रामार्फत ज्येष्ठ नागरिकांची माहिती घेऊन आधार क्रमांकानुसार तसेच त्यांच्या सोयीनुसार अर्ज भरून घेतले जात आहे. या केंद्रातून अधिकाधिक ज्येष्ठांची नोंदणी करून घेतली असून संबंधित लसीकरण केंद्रात जाऊन ते लस टोचून घेत आहे. ऑनलाइन नोंदणी केंद्र सुरू केल्यामुळे ज्येष्ठांना सुलभ झाले असून ही नोंदणी ३१ मार्चपर्यंत केली जाणार असल्याचे नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी सांगितले.