आरटीईतर्फे विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:26 IST2021-03-24T04:26:35+5:302021-03-24T04:26:35+5:30
चंद्रपूर : शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत पुढील सत्रामध्ये जिल्ह्यातील १४५ शाळांमधून १२३० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. जिल्ह्यातील १४५ शाळांनी यासाठी ...

आरटीईतर्फे विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश
चंद्रपूर : शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत पुढील सत्रामध्ये जिल्ह्यातील १४५ शाळांमधून १२३० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. जिल्ह्यातील १४५ शाळांनी यासाठी शिक्षण विभागाकडे नोंदणी केली आहे. मागासवर्गीय, दिव्यांग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी शाळेतील एकूण क्षमतेच्या २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
प्रोत्साहन योजनेचे अनुदान थकीत
चंद्रपूर : आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी समाजकल्याण विभागातर्फे आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहन योजना शासनाकडून राबविली जाते. या योजनेंतर्गत जिल्ह्यात मागील तीन वर्षात सुमारे ६०० जोडप्यांनी अर्ज केला. मात्र, विभागाकडे निधी नसल्याने आजपर्यंत तब्बल ५७१ प्रस्ताव प्रलंबित आहेत, तर २२५ जोडप्यांना सुमारे सव्वाकोटीचे वितरण करण्यात आले आहे. लाभार्थी अनुदानासाठी चकरा मारत आहेत.
जात पडताळणीची अनेक प्रकरणे प्रलंबित
चंद्रपूर : चंद्रपुरातील जिल्हा जात पडताळणी समितीच्या अध्यक्षांकडे चंद्रपूरसह अन्य तीन जिल्ह्याचा प्रभार देण्यात आला आहे. यासह संशोधन अधिकाऱ्यांकडेसुद्धा चंद्रपूर व गडचिरोली समाजकल्याण विभागाचा प्रभार असल्याने मोठ्या प्रमाणात कामाचा ताण वाढला आहे. परिणामी जात पडताळणीची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत.
एसटी वाहकांसमोर चिल्लरचा प्रश्न
चंद्रपूर : लाॅकडाऊननंतर पुन्हा एसटी धावत आहे. मात्र बसच्या वाहकांसमोर चिल्लरचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे प्रवाशांना मात्र याचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. बसमधून प्रवास करताना टप्प्याप्रमाणे प्रवाशांकडून तिकिटाची रक्कम घेतल्या जाते. एखाद्या ठिकाणच्या प्रवासादरम्यान तीन टप्पे पडत असतील तर त्या प्रवाशाला तिकीट लागते. प्रवाशाकडे चिल्लर पैसे असल्यास देतो. मात्र अनेक वेळा सुटी पैसे राहत नसल्याने वाहक त्या तिकिटामागे शिल्लक रक्कम लिहून देतो.
शेती रस्त्याची माेजणी करावी
चंद्रपूर : ग्रामीण भागातील पांदण रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पांदण रस्ते व गावाची शीव आता संकटात आहे. त्यामुळे प्रशासनाने गावागावातील पांदण तसेच शेतरस्त्यांची मागणी करून सिमारेशा आखून द्याव्या, अशी मागणी केली जात आहे.
योजनांपासून शेतकरी वंचित
चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावातील शेतकरी कर्जमाफी व ओला दुष्काळ नुकसान भरपाई लाभापासून अद्यापही वंचित आहे. त्यामुळे सदर लाभ त्वरित केंद्र व राज्य शासनाने द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते आहे.
बाजारातील गर्दीवर नियंत्रण नाही
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारारात गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. असे असले तरी नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. बाजारामध्ये मोठ्या संख्येने ग्राहक खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे अधिकाधिक दंड आकारून त्यांना शिस्त लावावी, अशी मागणी सामान्य नागरिकांनी केली आहे.
संग्रहालयाची स्थापना करावी
चंदपूर : जिल्ह्यातील ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या भद्रावती व निजामकालीन राजुरा शहरात ऐतिहासिक संग्रहालय उभारण्यात यावे. या भागातील ऐतिहासिक पाऊलखुणा जतन होईल. त्या माध्यमातून भावी पिढीला इतिहास समजण्यास सोपे होईल.