खोटे दस्तावेज तयार करून केली फसवणूक
By Admin | Updated: March 27, 2015 00:50 IST2015-03-27T00:50:32+5:302015-03-27T00:50:32+5:30
तालुक्यातील चौगान येथील शेतजमिनीच्या बनावट कागदपत्रे तयार करून रजिस्ट्रर कार्यालयात नोंदणीही केली.

खोटे दस्तावेज तयार करून केली फसवणूक
ब्रह्मपुरी : तालुक्यातील चौगान येथील शेतजमिनीच्या बनावट कागदपत्रे तयार करून रजिस्ट्रर कार्यालयात नोंदणीही केली. परंतु फेरफार करताना पकडल्या गेल्याने चौगानचे तलाठी अनुरथ नथ्थू नारनवरे यांच्या तक्रारीवरून गणेश विनोद नखाते (रा.चकबोथली) याच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे. परंतु गुरूवारी सायंकाळपर्यंत आरोपीला अटक करण्यात आली नव्हती.
तालुक्यातील चकबोथली या गावातील भूमापन क्रमांक ३३ मधील दोन हेक्टर ३० आर ही शेतजमीन आरोपी गणेश विनोद नखाते याच्या वडीलाच्या नावे होती. शेतजमिन विकण्यासाठी वडील तयार नसल्याने आरोपी गणेशने चक्क खोटे स्टॅम्प, खोटे शपथपत्र तयार करून सातबाऱ्यावर आपल्या नावाची नोंद करून घेतली. एवढेच नाही तर एका इसमाला १३ मार्च २०१४ रोजी आठ लाख ६० हजार रुपयांना विकून ब्रह्मपुरीच्या दुय्यम निबंधक कार्यालयात शेतजमिनीची रजिस्ट्री करून घेतली. खोटे शपथपत्र, खोट्या सह्या व शिक्के बनवून तहसिलदारांनी व दुय्यम निबंधक अधिकाऱ्यांनी बारकाईने न पाहता त्यावर स्वाक्षऱ्या करून नोंदणीची प्रक्रीया पूर्ण केल्याने संबधित अधिकारीही अडचणीत येण्याची शक्यता आहे. नोंदणीनंतर जेव्हा ही शेतजमिन घेणाऱ्यांनी फेरफार करण्यासाठी चौगानचे तलाठी नारनवरे यांचेकडे कागदपत्रे सुपूर्द केली. तेव्हा तलाठ्याची संपूर्ण कागदपत्राची तपासणी केले असता, तलाठ्याच्या लक्षात आले की, मूळ रेकॉर्डवर संबंधित जमिन वडिलांचे नावे असून सातबारा मात्र आरोपी गणेशच्या नावे कसे काय? यावरून संशय येताच त्यांनी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदविली. (प्रतिनिधी)