मुनगंटीवारांच्या प्रयत्नामुळे चारवटचा कायापालट
By Admin | Updated: May 29, 2017 00:31 IST2017-05-29T00:31:35+5:302017-05-29T00:31:35+5:30
बल्लारपूर तालुक्यातील चारवट गाव इरई नदीच्या पुरामुळे पावसाळ्याच्या दिवसात नेहमीच वेढले जात होते. त्यामुळे वस्तीचे पुनर्वसन करण्याची मागणी होती.

मुनगंटीवारांच्या प्रयत्नामुळे चारवटचा कायापालट
चंदनसिंह चंदेल : दोन कोटींच्यावर विकास कामाचे भूमिपूजन
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यातील चारवट गाव इरई नदीच्या पुरामुळे पावसाळ्याच्या दिवसात नेहमीच वेढले जात होते. त्यामुळे वस्तीचे पुनर्वसन करण्याची मागणी होती. पुनर्वसन प्रक्रिया झाली. परंतु वस्तीचा विकास रखडला होता. चारवट पुर्नवसित गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २ कोटी ७१ लाख ५३ हजार ५४३ रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला. त्यांच्या प्रयत्नामुळे पुनर्वसीत चारवटचा कायापालट होण्यास मदत मिळणार आहे, असे प्रतिपादन वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी केले.
चंद्रपूर जिल्ह्यातील पुर्नवसित चारवट येथे शुक्रवारी सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन चंदनसिंह चंदेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बल्लारपूरचे नगराध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा होते.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून बल्लारपूर पंचायत समतीचे सभापती गोविंदा पोडे, जिल्हा परिषद सदस्य अॅड. हरीश गेडाम, बल्लारपूर तालुका भाजपाचे अध्यक्ष किशोर पंदीलवार, पंचायत समिती सदस्य सोमेश्वर पद्मगिरीवार, हडस्तीचे सरपंच बंडू पारखी, उपसरपंच गुणिता गौरकार, मुर्लीधर गौरकार, नांदगाव (पोडे) येथील सरपंच प्रमोद देठे, उपसरपंच मल्लेश कोडारी, बांधकाम उपअभियंता पी.पी. जोशी, अभियंता दोरखंडे यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी चंदनसिंह चंदेल म्हणाले की, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने प्रयत्नशील राहून शासनाकडे चारवट गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी केली. त्यानुसार २००६ मध्ये गावाचा पुनर्वसनाला मान्यता देण्यात आली. पुनर्वसित गावाचा विकास करण्यासाठी ६ मार्च २०१७ रोजी शासन निर्णय निर्गमित करून २ कोटी १८ लाख २७ हजार ८१७ रुपये किंमतीच्या अंदाजपत्रकाला मान्यता दिली.
या निधीतून गावातील अंतर्गत रस्ते, खडीकरणाचे काम, नाली बांधकाम व विद्युत व्यवस्था केली जाणार आहे. त्याचप्रमाणे ५३ लाख २५ हजार ७६६ रुपये ार्च करून गावात नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली जाणार आहे. एकूण २ कोटी ७१ लाख ५३ हजार ५८३ रुपये खर्च करून पुर्नवसित चारवटचा सर्वांगसुंदर विकास ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे होत असल्याचे चंदेल यांनी सांगितले.
नगराध्यक्ष हरीश शर्मा, सभापती गोविंदा पोडे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. संचालन माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर देऊळकर यांनी तर आभार भाजपाचे तालुकाध्यक्ष किशोर पंदीलवार यांनी मानले. यावेळी गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.