चार प्राथमिक आरोग्य केंद्रांचे काम रखडले

By Admin | Updated: November 4, 2015 00:51 IST2015-11-04T00:51:50+5:302015-11-04T00:51:50+5:30

तेलंगणा व महाराष्ट्र सीमेवरील नक्षलग्रस्त भाग असलेल्या राजुरा तालुक्यातील विरुर (स्टे) येथील..

Four primary health centers were restored | चार प्राथमिक आरोग्य केंद्रांचे काम रखडले

चार प्राथमिक आरोग्य केंद्रांचे काम रखडले

विरूर (स्टे) : तेलंगणा व महाराष्ट्र सीमेवरील नक्षलग्रस्त भाग असलेल्या राजुरा तालुक्यातील विरुर (स्टे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रस्ताव मागील १५ वर्षांपासून निधी अभावी शासन दरबारी धूळ खात पडला आहे. त्यामुळे परिसरातील हजारो नागरिकांना कोसोदूर जाऊन उपचार घ्यावा लागत आहे. परिसरातील चार प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम रखडले असून याकडे प्रशासन व शासनाचे दुर्लक्ष होत आहे.
विरूर (स्टे) येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची नितांत आवश्यकता आहे. येथे प्राथमिक आरोग्य व्हावे या मागणीसाठी विरुर व परिसरातील जनतेने शासनाकडे वारंवार निवेदन दिले, मागण्या केल्या. परंतु त्या निवेदनाला शासनाने केराची टोपली दाखविली आहे. त्यानंतर जनप्रतिनिधींच्या अथक प्रयत्नाने शासनाने राजुरा मतदार क्षेत्रातील विरूर (स्टे) सह चार प्राथमिक आरोग्य केंद्राना मान्यता दिली. त्यामुळे परिसरातील जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र चार आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्यासाठी आणि इमारत बांधकाम करण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी लोटूनही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामाला अजूनही सुरुवात न झाल्याने परिसरातील नागरिकात विरूर प्राथमिक आरोग्य केंद्रासह तीन आरोग्य केंद्र कधी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य शासनाने १७ जानेवारी २०१३ च्या आरोग्य विभागाच्या शासन निर्णयानुसार सन २००१ च्या लोकसंख्येच्या निकषावर आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व नक्षलग्रस्त भागातील शासनाचा विशेष कृती कार्यक्रम लागू असलेल्या भागात खास बाब म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी दिली. अपुऱ्या सोयी, कुपोषणासह आरोग्याचे अनेक प्रश्न आणि दुर्गम भागात असल्याने व्यापक जनहित लक्षात घेता या आरोग्य केंद्रांना मंजुरी प्रदान करण्यात आली होती.
ग्रामीण भागाचा विकास करीत असल्याचा दिंडोरा पिटणाऱ्या शासनाकडूनच नागरिकांच्या अनेक गंभीर समस्यांकडे डोळेझाक केली जात आहे. तालुक्यात विरूर (स्टे) हा गाव मोठा असून येथील लोकसंख्या आठ हजारच्यावर आहे. येथे आठवडी बाजार तसेच वन कार्यालय, रेल्वेस्थानक, शाळा, हायस्कूल, महाविद्यालय, पोलीस ठाणे आदी कार्यालये आहेत. तसेच या गावाला ३५ ते ४० खेडे जोडलेले आहे. परंतु, येथे प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने परिसरातील गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी जादा रक्कम मोजावे लागत असल्याचे चित्र आहे.
विरूर येथे पोलीस ठाणे असल्याने पोलीस विभागाला प्राथमिक आरोग्य केंद्राची कधीही आवश्यकता भासते. पोलीस विभागाला आरोपींची वैद्यकीय तपासणी करायची असल्यास विरूरपासून १५ किमी अंतरावर असलेल्या चिंचोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करावे लागते. हा भाग नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील भाग असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन दुसऱ्या ठिकाणच्या आरोग्य केंद्रात जावे लागत आहे.
सन १९९४ मध्ये विरूर पोलीस ठाण्यावर नक्षल्यांनी हल्ला चढविला. त्यानंतर जवळच असलेल्या माकुडी रेल्वेस्थानकावर नक्षल्यांनी हल्ला केला. त्यामुळे हा भाग नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो. काही विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे यासाठी यापूर्वी अनेकदा शासन दरबारी निवेदने दिले. परंतु त्या निवेदनाला शासनाने केराची टोपली दाखविली. मात्र लोकप्रतिनिधीने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन विरूर(स्टे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुर करण्याची मागणी रेटून धरली. त्यामुळे मंत्रालयाने विरूर (स्टे) प्राथमिक आरोग्य केंद्राला हिरवी झेंडी दाखविल्याने परिसरातील जनतेत आनंद पसरला. मात्र तीन वर्षाचा कालावधी लोटूनही बांधकामाचा पत्ता नाही. (वार्ताहर)

Web Title: Four primary health centers were restored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.