२५ गावांचा डोलारा चार पोलीस कर्मचाऱ्यांवर

By Admin | Updated: May 9, 2016 01:04 IST2016-05-09T01:04:54+5:302016-05-09T01:04:54+5:30

मूल पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बेंबाळ पोलीस चौकी हद्दीत एकूण २५ गावांचा समावेश आहे. ....

Four police personnel of 25 villages on four police personnel | २५ गावांचा डोलारा चार पोलीस कर्मचाऱ्यांवर

२५ गावांचा डोलारा चार पोलीस कर्मचाऱ्यांवर

गुन्हेगारीत वाढ : कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न
देवाडा बुज. : मूल पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बेंबाळ पोलीस चौकी हद्दीत एकूण २५ गावांचा समावेश आहे. सद्यस्थितीत त्या २५ गावांची शांतता, सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी केवळ चार पोलीस कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. संबंधित पोलीस चौकीत पोलीस कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवत असून बोटावर मोजण्याएवढे कर्मचारी याठिकाणी तैनात आहेत. त्यामुळे या परिसरात गुन्हेगारीमध्ये वाढ झाली आहे.
बेंबाळ पोलीस चौकीची स्थापना १९७९ साली करण्यात आली. तेव्हाच्या ४७ हजार ७९ लोकसंख्येत आता आणखी भर पडली आहे. त्या तुलनेत पोलीस बळ कमी आहे. त्यामुळे २५ गावांवर नियंत्रण ठेवण्यासाठी येथील कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. याठिकाणी एक पोलीस उपनिरीक्षक, दोन पोलीस शिपाई, एक हवालदार, एएसआय असे कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या ही बोटावर मोजण्यासारखी असल्याने २५ गावांचा डोलारा केवळ चार पोलीस कर्मचारी सांभाळत आहे. त्यामुळे त्यांची एक प्रकारे दमछाक होत असते. परिसरात वाढती गुन्हेगारी रोखणे, अवैध धंद्यावर आळा घालणे कठीण काम आहे. बेंबाळ पोलीस चौकीत केवळ चार पोलीस कर्मचारी तैनात असल्याने कधी काळी काही जण बंदोबस्त, कोर्ट पेशी व काही कर्मचारी साप्ताहिक रजेवर जात असतात. अशावेळी पोलीस चौकीत पोलीस गाईडशिवाय दुसरा कर्मचारी उपस्थित राहत नाही. अशावेळी पोलीस चौकी सामसुम असते. सर्वसामान्य नागरिकांची तक्रार घेण्यासाठी कोणीही हजर नसल्याने चित्र निर्माण होत आहे. असे असतानाही चौकीतील हे पोलीस कर्मचारी आपले सर्वस्व पणाला लावून कर्तव्य बजावित आहेत.
याठिकाणी यापूर्वी १० ते ११ पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा असल्याचे सांगण्यात येते. याशिवाय सदर पोलीस चौकीला उपपोलीस ठाण्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव शासनदरबारी खितपत पडलेला आहे. याठिकाणी पोलीस कर्मचारी अल्पसंख्येत असल्याने पोलीस चौकीचा कामकाज प्रभावित होत आहे.
२५ गावांच्या सुख सुविधासाठी कर्मचारी संख्या वाढविणे ही काळाची गरज आहे. पोलीस चौकीला नव्याने रुजू झालेले उपनिरीक्षक जावेद शेख यांनी परिसरात चालत असलेल्या अवैध दारूविक्रीवर लगाम लावला असून त्या पाठोपाठ चौकीचे सहायक उपोलीस निरीक्षक विजय संगमवार, प्रकाश हुलके, शिपाई, अशोक मांदाळे, वेलादी कर्तव्य बजावत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी येथील पोलीस बळ वाढवावे, अशी मागणी केली जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Four police personnel of 25 villages on four police personnel