वैद्यकीय महाविद्यालयासाठी चार आॅप्शन
By Admin | Updated: January 29, 2015 23:02 IST2015-01-29T23:02:59+5:302015-01-29T23:02:59+5:30
चंद्रपुरात वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले असले तरी जागेचा तिढा सुटता सुटत नाही. प्रशासनाने सुचविलेल्या जागेवर आक्षेप असल्याने हे वैद्यकीय महाविद्यालय नेमके होणार तरी कुठे,

वैद्यकीय महाविद्यालयासाठी चार आॅप्शन
जनतेच्या विकासाभिमुख जागा द्या : नरेश पुगलियांनी सुचविले
चंद्रपूर : चंद्रपुरात वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले असले तरी जागेचा तिढा सुटता सुटत नाही. प्रशासनाने सुचविलेल्या जागेवर आक्षेप असल्याने हे वैद्यकीय महाविद्यालय नेमके होणार तरी कुठे, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. दरम्यान काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलिया यांनी गुरूवारी शहरालगतच्या चार जागा सुचविल्या. सर्वसामान्य जनतेच्या सोईच्या तसेच पर्यावरण आणि वाहतुकीच्या दृष्टीने या चारही जागांचा विचार जनतेनेच करावा, असे सांगत त्यांनी जनतेच्या दरबारत हा चेंडू ठेवला आहे.
भविष्यात उदयास येऊ पहाणाऱ्या नव्या चंद्रपुरातील म्हाडा वसाहतीमधील उपयोजनासाठी राखीव जागा, वनरजिक महाविद्यालयातील जागा आणि वास्तू, प्रशासनाने सुचविलेला पागलबाबा नगरातील शासकीय भूखंड आणि बाबूपेठ परिसरातील रेल्वे उड्डण पुलालगतची जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्राच्या परिसरातील जागा गुरूवारी त्यांनी निदर्शनास आणून दिल्या. म्हाडा वसाहतीमधील जागा नव्या चंद्रपूरच्या विकासाच्या दृष्टीने सर्वाधिक योग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. म्हाडा परिसरात वेगवेळ्या उपयोजनेसाठी भुखंड आरक्षित आहेत. या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय उभारल्यास नव्या शहराचा विकास झपाट्याने होईल, वाहतुकीची साधने सहज उपलब्ध होतील आणि प्रदुषणमुक्त वातावरण मिळेल हे त्यांनी लक्षात आणून दिले. वनरजिक महाविद्यालयातील जागा दोन वर्षांपूर्वीच आपण शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती, मात्र या परिसरात जाणिवपूर्वक वनविभागाशी संबधित कार्यालये घुसविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. असे असले तरी वित्त, वन आणि नियोजन हे महत्वपूर्ण विभाग सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे असल्याने लिजवर ही जागा मिळणे कठीण नसल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या पागलबाबा नगरातील जागा एमईएलपासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. वाहत्या वाऱ्यासोबत फेरो मॅग्नीजची राख या परिसरात उडत असते. लागूनच अर्धा किलोमीटरवर मनपाचे कचरा डंपींग यार्ड आहे. बाहेरगावच्या नागरिकांना यथे पोहचण्यासाठी बरीच कसरत करावी लागणार असल्याने ही जागा वैद्यकीय महाविद्यालासाठी कशी सोईची ठरू शकते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या जागेवर मोठाले खड्डे असल्याने ते बुजविण्यासाठी आणि पुलाच्या बांधकामासाठी शासनाने ६५ कोटी रूपयांची तरतुद केली आहे. अन्यत्र महाविद्यालय झाल्यास हा खर्च वाचणार आहे.
डायट कॉलेजच्या परिसरातील जागाही त्यांनी सुचविली. जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागाच्या ताब्यात ही जागा आहे. परिसरात इमारतीही आहेत. नॉर्मल स्कूलची जागाही मोकळी असल्याने प्रशासनापुढे त्यांनी या जागेचाही पर्याय ठेवला. (जिल्हा प्रतिनिधी)